संगमनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह !

नाशिक नार्कोटिक्स पथकाकडून गांजाचा महासाठा जप्त !!

! अवैध धंद्यांचा अड्डा संगमनेर !

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरालगत असलेल्या सुकेवाडी शिवारात नाशिक नार्कोटिक्स विभागाने स्थानिक पोलिसांना सोबत घेत एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपये किमतीचा ४५६ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे संगमनेरमधील अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या अमली पदार्थ विक्री तस्करीचा आणि अवैध धंद्यांचा अड्डा संगमनेर ठरले आहे. या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. छाप्यानंतर मुख्य आरोपी तुषार उत्तम पडवळ (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) हा फरार झाला आहे.

नाशिक येथील नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांना सुकेवाडी गावात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उपअधिक्षक पाटील यांनी तातडीने एक पथक तयार करून सुकेवाडी येथे धाड टाकली.

आरोपी तुषार पडवळ याच्या घराची झडती घेतली असता, सुरुवातीला ३०० किलो गांजा घरात मिळून आला. त्यानंतर परिसरातील एका छोटा हत्ती टेम्पोची तपासणी केली असता, त्यात आणखी १५६ किलो गांजा पाकिटांमध्ये पॅक करून ठेवलेला आढळला. अशा प्रकारे एकूण ४५६ किलो सुका गांजा, तसेच अन्य वस्तू असा सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

या कारवाईत उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज खरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा शहरालगत सापडणे, ही बाब गंभीर आहे. नाशिकचे पथक थेट संगमनेरात येऊन कोट्यवधी रुपयांचा गांजा पकडते, मात्र स्थानिक संगमनेर शहर पोलिसांना याबाबत कानोकान खबर नसावी, यावर आता जोरदार टीका होत आहे.

शहर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी अद्याप अवैध धंद्यावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. अपवाद वगळता केवळ किरकोळ गुन्हे हाताळण्यात पटाईत असलेले येथील पोलीस इतक्या मोठ्या रॅकेटकडे दुर्लक्ष कसे करू शकतात, असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

अनेक अवैध धंद्यांना अभय देऊन ‘मोठ्या माशांना’ वाचवण्यासाठी आणि ‘छोट्या माशांना’ गळाला लावून किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्याचे प्रकार शहरात वाढत असल्याचे बोलले जात आहे. शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर आरोप होत आहेत. फरार आरोपी, चैन स्नॅचिंग, दरोड्याचे गुन्हे अद्यापही उलगडलेले नसताना, सव्वा कोटीचा गांजा पकडण्यासाठी बाहेरच्या पथकाला यावे लागणे, हे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.

नार्कोटिक्स विभागाने आता फरार आरोपी पडवळ याच्यासह या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, माल कोणाकडून येत होता आणि कोणाला पुरवला जात होता, याचा सखोल तपास सुरू केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!