कुठे गायब झाले गोवंश रक्षक ?
संगमनेरात कत्तलखान्यांवर मोठी कारवाई !
हजारो किलो गोवंश मांसासह 13 लाखाचा मुद्देमाल जप्त !!
पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई…
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांमधून सुरू असलेली गोवंश हत्या आणि गोमांस विक्री अव्यवाहातपणे सुरू असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी कत्तलखान्यांविरुद्ध आवाज उठवणारे गोवंश रक्षक आता मात्र सोयीनुसार गायब झाले असून कत्तलखान्यांना विरोध करण्याचा मक्ता घेतलेले हिंदुत्ववादी राजकीय पुढारी देखील चिडीचूप बसलेले दिसतात. कुठे गायब झाले गोवंश रक्षक असा सवाल उपस्थित झाला आहे.

संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या पथकाने दोन ठिकाणी छापे घालून हजारो गोवंश मांसासह 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या दोन दिवसात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. कत्तलखाने सुरू असल्याने पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. तर ते बंद करा म्हणून गाजावाजा आणि आरडाओरडा करणारे आता सत्तेत बसलेले असताना देखील कुठलीच कारवाई होत नसल्याने सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील भारत नगर परिसरात छापा टाकून सुमारे 4000 किलो गोवंशमांस जप्त करीत 8 लाख 4 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणात समद कुरेशी आणि नवाज कुरेशी (दोघे राहणार भारतनगर, संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी राहुल कैलास सारबंदे, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस उपअधीक्षक कार्यालय यांनी फिर्याद दिली आहे.
तर भारतनगर मधीलच दुसऱ्या छाप्यात पोलिसांनी हजारो किलो गोवंशमांस जप्त करीत 5 लाख 2 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल रघुनाथ कडलगं, पोलीस उपाधीक्षक कार्यालय यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून वाहिद कुरेशी (राहणार भारतनगर, संगमनेर) याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईने संगमनेर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या आणि कत्तली होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. पोलिसांच्या कारवाया चालू असल्या तरी राजकारणासाठी आंदोलन करणारे मात्र सत्ता असूनही कायमस्वरूपी कत्तलखाने बंद करण्यात यशस्वी झाले असल्याचे चित्र असून आता फक्त बघ्याची भूमिका घेऊन तथाकथित कत्तलखाना विरोधकांनी चुप्पी साधली आहे.
