संगमनेर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष !
‘त्याच त्या’ चेहऱ्यांना पदे मिळत असल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी !!
विशेष प्रतिनिधी –
संगमनेर काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडीवरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. पक्षासाठी अहोरात्र राबणाऱ्या आणि निष्ठा जपणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये या निवडीमुळे तीव्र असंतोष आणि अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. “ज्यांच्याकडे आधीच पदे आहेत, ज्यांनी सत्तेची सर्व फळे चाखली, त्यांनाच पुन्हा पुन्हा पदे दिली जात असून, प्रामाणिक कार्यकर्त्यांना मात्र सातत्याने डावलले जात आहे,” असा थेट आरोप करत कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत चमचेगिरीवर जोरदार प्रहार केला आहे.
नगरपालिका, जिल्हा परिषद, सहकार आणि इतर विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्षानुवर्षे महत्त्वाची पदे उपभोगणाऱ्या ठरावीक व्यक्तींनाच पुन्हा एकदा काँग्रेस संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. स्थानिक नेतृत्वाने नेहमीप्रमाणे याच ‘ठराविक’ चेहऱ्यांवर मेहेरनजर दाखवल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. हा प्रकार म्हणजे पक्षासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांचा घोर अपमान असल्याची भावना आता उघडपणे बोलून दाखवली जात आहे.

“आम्ही फक्त आंदोलन आणि जयजयकाराच्या घोषणा द्यायला आणि निवडणुकीत गर्दी जमवून राबायलाच आहोत का ? आमचा वापर फक्त वापरून सोडून देण्यासाठीच होणार का ? मग आम्हाला पदे कधी मिळणार?” असे विविध सवाल अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळतात.
पक्षातील सुजाण कार्यकर्त्यांच्या मते, पदे वाटप करताना कोणत्याही प्रकारचा सामाजिक, धार्मिक किंवा जातीय समतोल राखला गेलेला नाही. काँग्रेसच्या सर्वसमावेशक परंपरेला हरताळ फासण्याचे काम या निवडीतून झाले आहे. “निवडणुकीच्या काळात किंवा संघर्षाच्या वेळी जे जमिनीवरून गायब असतात, जे फक्त नेत्यांची चमचेगिरी करण्यात मग्न असतात, त्यांनाच लाल गालिचा अंथरला जातो,” असा थेट आणि बोचरा आरोप कार्यकर्ते करत आहेत. हाच प्रकार यापूर्वी युवक काँग्रेसच्या निवडींच्या वेळी घडला आहे. आणि आताही मुख्य काँग्रेस पक्षाचीही तीच घसरण सुरू असल्याचे बोलले जात आहे.

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात विरोधकांकडून काँग्रेस नेत्यांवर जेव्हा जेव्हा चिखलफेक होते, तेव्हा ही पदे लाटलेली मंडळी सुरक्षित अंतर ठेवून अक्षरशः मूग गिळून गप्प बसतात. नुकतेच माजी नगराध्यक्षांवर झालेल्या आरोपांच्या वेळीही त्यांचे आजी-माजी सहकारी तोंड बंद करून बसले. कोणताही पदभार नसलेला सामान्य, निष्ठावान कार्यकर्ता विरोधकांशी भिडतो. अशा निष्क्रीय आणि पळपुट्या लोकांना पुन्हा पुन्हा पदे देऊन स्थानिक नेतृत्व नेमका काय संदेश देत आहे, असा सवाल सोशल मीडियावरून आणि अंतर्गत बैठकांमधून विचारला जात आहे.
कार्यकर्त्यांच्या या तीव्र तक्रारींकडे आणि वाढत्या असंतोषाकडे स्थानिक नेतृत्व गांभीर्याने पाहणार की नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करून पक्षाला आणखी कमकुवत करणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जर पक्षाची संघटना मजबूत करायची असेल, तर या चमचेगिरी करणाऱ्या कंपूशाहीला बाजूला सारून खऱ्या अर्थाने मैदानात लढणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे, अन्यथा हा असंतोष निवडणुकीत पक्षाला महागात पडू शकतो, असा इशाराही कार्यकर्त्यांच्या गोटातून दिला जात आहे.
