संगमनेर शहरात पुन्हा अमली पदार्थ….
पोलिसांनी गांजा पकडला ; एकाला अटक, दोघांवर गुन्हा
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यासह शहरात अमली पदार्थाची आणि ड्रग्स विक्री होत असल्याचे हळूहळू उघड होत आहे. पोलिसांच्या कारवाईतून दोन प्रकरणे समोर आली. काही दिवसांपूर्वी ड्रग्सची इंजेक्शन विकताना आदित्य किशोर गुप्ता या तरुणाला पकडण्यात आले होते. त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर शहरातील अमली पदार्थांचे प्रकरण चांगलेच चव्हाट्यावर आले. पोलिसांनी पुन्हा कारवाई करीत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडले असून एकाला अटक करण्यात आली आहे.

अबरार रऊफ शेख (वय 46 वर्षे राहणार अलका नगर, संगमनेर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर नासिर मोहम्मद शेख (वय 40 वर्षे राहणार संगमनेर) हा आरोपी पसार झाला आहे
सोमवारी संध्याकाळी यातील आरोपी अबरार शेख हा शहरा मधील मदिनानगर परिसरात पाच पीर बाबा येथील बंद घराच्या आडोशाला 1 किलो 538 ग्रॅम वजनाचा गांजा स्वतःजवळ बाळगून असल्याचा आणि विक्री करताना पोलिसांना छापा टाकल्यावर मिळून आला. सदरचा गांजा आरोपीने नासिर मोहम्मद शेख याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली तर दुसरा आरोपी पसार आहे.

आरोपीकडून याप्रकरणी 26 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये गांजा, गांजाच्या पुड्या आणि काही रोख रक्कम सुद्धा जप्त करण्यात आली आहे. एकंदरीत पाहता संगमनेर मध्ये अमली पदार्थ विक्रीचे प्रमाण मोठे असल्याचेच यावरून दिसून येत आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस हवालदार बाबासाहेब सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे, विजय खुळे, अजित कुऱ्हे, राहुल पांडे, राहुल क्षीरसागर, रामकिसन मुकरे आदींनी सहभाग घेतला होता. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
