संगमनेरात ड्रग्स विक्रेता पकडला  ! संगमनेरच्या सुसंस्कृतपणाला बट्टा 

शहरात अमली पदार्थांचा धुमाकूळ 

संगमनेर प्रतिनिधी —

गेल्या वर्षभरापासून संगमनेर शहरात अमली पदार्थांच्या विक्रीने धुमाकूळ घातला होता. याचबरोबर अतिशय घातक अशा ड्रग्सची  देखील विक्री संगमनेरात सुरू होती. ‘संगमनेर टाइम्स’ ने यावर वेळोवेळी आवाज उठवला होता. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. संगमनेर शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्याला ड्रग्स ने विळखा घातला आहे. आता हे उघड झाले असून शहर पोलिसांनी शहरातील ड्रग्स विक्रेत्यावर छापा टाकत अमली पदार्थ ड्रग्स जप्त केले आहेत. विशेष म्हणजे ही कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चा होती.

 

संगमनेर शहरातील अवैध धंद्यांमध्ये आता थेट नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची ‘ड्रग्स’ अर्थात अमली पदार्थांची भर पडल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत चर्चा सुरू असलेल्या या व्यवसायासंदर्भात आता पोलीस कारवाईमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. शहरातील एका नामांकित चौकातील ‘सप्लिमेंट शॉप’ मध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणाईला नशेसाठी लागणारे ड्रग्स विनापरवाना विकले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. संगमनेरमधील तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी ही कारवाई केली आहे. नगरपालिके समोर लाल बहादूर शास्त्री चौकातील ‘एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेन्ट शॉप’मध्ये एका इसमाकडून नशेसाठी वापरले जाणारे ‘MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA’ हे औषध अवैधरित्या विकले जात आहे, अशी गोपनीय माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर त्यांनी एका व्यक्तीला ‘डमी ग्राहक’ बनवून सोमवारी दुपारी सव्वा तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान औषध खरेदी करण्यासाठी दुकानात पाठवले. आणि कारवाईसाठी सापळा लावला. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारे हे इंजेक्शन विनापरवाना विक्री करत असल्याचे आढळून आल्याने या कारवाईत पोलिसांनी आदित्य किशोर गुप्ता या तरुणाला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता दुकानाच्या टेबलावर ६,६००/- किमतीच्या ‘MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA 10 ML’ च्या ०३ बॉटल्स आणि ०९ इंजेक्शन सिरींजसह एकूण २,२३,१२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये एक ॲपल कंपनीचा मोबाईल फोन आणि एका यामाहा कंपनीच्या मोटारसायकलचा (MH.15.HP.6646) समावेश आहे.

याप्रकरणी आरोपी आदित्य गुप्ता याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२३, १२५ आणि २७८ नुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगाराला वाचविण्यासाठी राजकीय हस्तक्षेप

सदर प्रकरणात आरोपी असलेला आदित्य गुप्ता हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करू नये म्हणून राजकीय हस्तक्षेप झाला, मात्र पोलिसांनी खमकी भूमिका दाखविल्याने अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली मात्र याप्रकरणी एफआयआर रात्री सव्वा नऊ वाजता दाखल झाली. या विषयात पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आला होता, कलमे कमी करण्याच्या अनुषंगाने सुद्धा हस्तक्षेप करण्यात आला असल्याची चर्चा सुरू होती.

संगमनेरच्या सुसंस्कृतपणाला बट्टा –

ड्रग विक्रीमुळे संगमनेर शहराच्या सुसंस्कृतपणाला बट्टा लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. संगमनेरकरांनी याप्रकरणी वेळीच सावधान होण्याची गरज आहे, अशाप्रकारे जर कोणी नशा करत असेल तर या संदर्भातील माहिती पोलिसांना कळविणे सुद्धा आवश्यक आहे, अन्यथा संगमनेरची ओळख उध्वस्त होऊन जाईल.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!