संगमनेर शहरात ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल !
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली माहिती
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
ध्वनी प्रदूषण अधिनियमानुसार कोणत्याही प्रकारचे वाद्य, लाऊड स्पीकर वाजविण्यापूर्वी त्याबाबतची परवानगी संबंधित पोलीस स्टेशन कडून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित पोलीस स्टेशन वेळेचे व आवाजाच्या डेसिबल मीटरच्या मर्यादा घालून संबंधित वाद्य, लाऊड स्पीकर लावण्यास परवानगी देत असते.

संगमनेर शहरात ईद ए मिलाद ची मिरवणूक आयोजित करण्यात आलेली होती. सदर मिरवणुकीला परवानगी देण्यात आलेली होती. परंतु लाऊड स्पीकर व अन्य वाद्य यांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. परवानगी देताना ध्वनी प्रदूषणा संबंधाने निर्बंधाच्या विविध सूचना देण्यात आलेल्या होत्या.परंतु प्रत्यक्ष मिरवणुकीमध्ये मात्र काही डीजेची वाहने सामील करण्यात आलेली होती.

अशा 2 डीजे वाहनांवर व त्यांच्या चालकांवर संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्याय संहिता कलम 223 त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 3, 15 त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. दोन्हीही डीजेची वाहने जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस तपासामध्ये संबंधित वाहने ज्या आयोजकांनी बोलावली आहे त्यांना उघड करून त्यांना देखील सह आरोपी करण्यात येणार आहे.
