ग्रामसेवकाची गचांडी धरणाऱ्या उपसरपंचावर गुन्हा दाखल !
संगमनेर तालुक्यातील घटना
प्रतिनिधी —
पूर्वीपासूनच वादग्रस्त असणाऱ्या उपसरपंचाने ग्रामसेवकाला शिवीगाळ करत त्याची गचांडी धरून धक्काबुक्की केल्याने सारोळे पठार येथील उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे याच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आधी सुद्धा या उपसंचावर गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत.

संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथील ग्रामसेवक अजित वसंत घुले यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून घारगाव पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे हा नेहमीच ग्रामसेवकाला त्रास देत असल्याचे म्हटले आहे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत असताना हातामधून कागद हिसकावून घेऊन ते फाडले व चुरगळले. तसेच मोबाईल हिसकावून घेऊन झटापट करीत माझी गचांडी धरली व हात पिरगळला आणि सरकारी कामात अडथळा आणला.

अशा स्वरूपाची फिर्याद ग्रामसेवक अजित घुले यांनी दिली आहे. त्यामुळे उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सरकारी कामात अडथळा आणणे त्याचबरोबर लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावत असताना भीती दाखवणे असा गुन्हा फटांगरे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

वादग्रस्त उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे यांच्या विरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल झालेले आहेत. आता या नवीन गुन्ह्यामुळे पुन्हा ते गुन्हे चर्चेत आले आहेत. यापूर्वी फटांगरे यांनी ग्रामपंचायती मध्ये अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात त्याला अटकही झाली होती.
