संगमनेरच्या कत्तलखान्यांत पुन्हा गोवंश हत्या !
५०० किलो गोवंशमांसा सह ११ लाखाचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी —
गोवंश हत्या करणाऱ्या कत्तलखान्यावर संगमनेर पोलिसांनी पुन्हा छापा घातला असून ५०० किलो गोवंश मांस, चार चाकी वाहने, कुऱ्हाड, दोन चाकू, ३ गायी, एक वासरू यांच्यासह ११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.

साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी (वय १९ वर्षे) आणि सालीम मुस्ताक कुरेशी (वय २४ वर्षे दोन्ही राहणार कोल्हेवाडी रोड, संगमनेर) यांना अटक करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या संगमनेर येथील अवैध कत्तलखान्यांमधून गोवंश हत्या नेहमीच घडत असतात. थोड्याफार काळापुरत्या बंद झाल्यानंतर पुन्हा या गोवंश हत्या सुरू होतात. पोलिसांनी या ठिकाणी अनेक वेळेला छापे घातले आहेत. अनेक कारवाया केल्या आहेत. तरीही या गोवंश हत्या आणि कत्तलखाने बंद होत नाहीत.

यामध्ये पोलिसांसह प्रशासनाचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. सर्वच पोलीस अधिकारी या जबाबदार नसले तरी पोलिसांमध्येच काही बंडखोर पोलीस हे कत्तलखान्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा नेहमीच होत आली आहे. बंडखोर पोलिसांमुळे अवैध कत्तलखाने आणि गोवंश हत्या प्रकरणी संगमनेर पोलिसांची संपूर्ण जिल्ह्यात नाचक्की झालेली आहे.

आज पहाटे संगमनेर शहर पोलिसांनी कोल्हेवाडी रोड येथे छापा घालून त्या ठिकाणी गोवंश हत्या सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर ५०० किलो गोवंश मास जप्त केले. यावेळी हे मांस वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी ३ चार चाकी वाहने (एक छोटा हत्ती, पिकप जीप आणि मारुती स्विफ्ट गाडी) देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच घटनास्थळावरून कुऱ्हाड, दोन धारदार चाकू, तीन गायी आणि एक वासरू देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.

साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी, सलीम मुस्ताक कुरेशी यांना अटक करण्यात आलेली आहे. यासंदर्भात पोलीस नाईक सचिन कचरू उगले यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास चालू आहे.
