काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सदस्याची डॉक्टरच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी !
चत्तर यांच्याविरुद्धही बदनामीचा गुन्हा दाखल ; एकमेका विरुद्ध गुन्हे दाखल
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सोशल मीडियातून हीन दर्जाची टीका केल्याने प्रकरण वाढले.
प्रतिनिधी —
आमच्या नादाला लागले तर तुमच्या खांडोळ्या करू असे म्हणत डोक्याला पिस्तूल लावून संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश थोरात यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आल्याने पोलिसांनी सुरेश थोरात यांच्यासह ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील व्हेटरनरी डॉक्टर विवेक भास्कर चित्तर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीत त्यांनी असे म्हटले आहे की, गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मी जोर्वे येथे जनावरे तपासण्यासाठी गेलो असता माझे वडील भास्कर चत्तर यांनी मला फोन करून कळवले की आपल्या घरात लोक येऊन धमकावत आहेत. घरात संपूर्ण भितीचे वातावरण झाले आहे. तेव्हा तू लवकर घरी ये. असे कळवल्यावर मी आमच्या घरी गेलो असता घरासमोर ५० ते ६० लोक हातात लोखंडी रॉड, कोयते, कुऱ्हाडी घेऊन उभे होते. त्यांना मी विचारले तुम्ही येथे काय करता. तेव्हा त्यांनी मला शिवीगाळ करून दमदाटी केली व माझ्यावर धावून आले. तेव्हा मी घाबरून घरात गेलो. त्यावेळी घरामध्ये सुरेश जगन्नाथ थोरात (रा. जोर्वे. ता. संगमनेर) हा हातात पिस्तूल घेऊन उभा होता. माझे आई व भावजयी मोठ्याने रडत होते व त्यांचा हातापाया पडत होते. तेवढ्यात मला योगेश शांताराम जोशी उर्फ पप्पू गुरु व भाऊसाहेब बाबुराव दिघे (दोघे रा. जोर्वे, ता. संगमनेर) यांनी घरात येऊन मला पकडले व त्याच वेळेस सुरेश जगन्नाथ थोरात याने माझ्या डोक्याला पिस्तूल लावला व म्हणाला तुला व तुझा भाऊ स्वानंद याला जीवे मारून टाकेल. तुझा भाऊ कुठे आहे. तो जास्त माजलाय. तुमच्या घरातला कोणी पण जोर्वे गावात दिसल्यास त्यांचा खांडोळ्या करून नदीत फेकून देऊ. आमचे नादी लागू नका. लागले तर तुमचा काटा काढू. अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यावेळी सुरेश थोरात, मुकेश विठ्ठल काकड यांनी घरात येऊन माझी आई, भावजयी व अंधवडील भास्कर चत्तर यांना वाईट वाईट शिवीगाळ करून, धक्काबुक्की करून परत जाताना तुझ्या भावाला गोळ्या घालू अशी धमकी देऊन निघून गेले. म्हणून माझी या सर्वांनी विरोधात फिर्याद आहे.
संगमनेर तालुका पोलिसांनी या संदर्भात सुरेश जगन्नाथ थोरात, योगेश शांताराम जोशी उर्फ पप्पू गुरु, भाऊसाहेब बाबुराव दिघे, सुनील जगन्नाथ थोरात, मुकेश विठ्ठल काकड (सर्व रा. जोर्वे ता. संगमनेर) यांच्या सह ५० ते ६० अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्वानंद भास्कर चत्तर (रा. पिंपरणे. ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध देखील सुरेश थोरात व इतर २५ ते ३० जणांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दिला असून त्या तक्रार अर्ज असे म्हटले आहे की, स्वानंद चत्तर यांनी सोशल मीडियातून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विषयी अत्यंत घाणेरडी टीका केली असून लज्जास्पद वाटेल अशी टीका टिप्पणी केली. त्यामुळे जोर्वे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी सदर व्यक्तीला समज देण्यात येऊन माफी मागायला लावावी व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. या तक्रारीवरून स्वानंद चित्तर यांच्याविरुद्ध बदनामीचा गुन्हा दाखल केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

माजी मंत्री थोरात यांची सोशल मीडियात बदनामी करणाऱ्यांनी केली खोटी तक्रार — सुरेश थोरात
स्वानंद चत्तर याने दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी विधानसभेत सुरू असलेल्या माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या भाषणाबाबत facebook पोस्टवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका टिप्पणी केली. हे संपूर्ण तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. एका वृत्तवाहिनीवर सुरू सुरू असलेल्या अधिवेशनाच्या वृत्तांकनाच्या स्क्रीन शॉट वर त्याने ही पोस्ट लिहिली. याबाबत तमाम जनतेतून तीव्र संताप निर्माण झाला.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार थोरात यांचे व्यक्तिमत्व, त्यांचा सुसंस्कृतपणा हा संपूर्ण राज्याला माहित आहे. आणि त्यांच्याविषयी नवख्या, आणि प्रसिद्धीसाठी हापापलेल्या चत्तर याने चुकीचे लिहिणे अत्यंत दुर्दैवी वाटले .
म्हणून गावातील काही नागरिकांनी अत्यंत सुज्ञपणे संबंधित व्यक्तीच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन चर्चा केली. की तुमच्या मुलाने असे लिहिणे योग्य नाही. आमदार थोरात गेली ४० वर्षे राजकारणात आहेत. तुमच्या मुलाचे वय अवघे पंचवीस वर्षे आहे. तरी कृपया त्याला यापुढे असे चुकीचे लिहीत जाऊ नको असे समजावून सांगितले. यामध्ये कोणी कधीही अरेरावी केली नाही. त्याचे आई-वडील समोर आले असता सर्वांनी सामंजस्याने हे मान्य केले. आणि विषय मिटला. परंतु या घटनेतून आपण प्रसिद्धीच्या झोतात येऊ या उद्देशाने प्रकरणाला पूर्णपणे राजकीय वळण दिले गेले आहे. त्याने केलेले आरोप हे अत्यंत निराधार व चुकीचे आहेत. यामध्ये एकही आरोप सिद्ध होऊ शकणार नाही. उलट आमची अशी मागणी आहे की, संबंधित व्यक्तीची पूर्ण तपासणी व्हावी. त्याच्यामागे कोण आहे हे पण तपासले जावे. अशी आम्ही समस्त ग्रामस्थ व तालुक्याच्या वतीने मागणी करत आहोत. असे प्रसिद्ध पत्रक पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश थोरात यांनी दिले आहे.

