चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या करणार्या नराधमास अटक !

१० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगून आला तरीही खून केलाच
राजूर पोलिसांची कामगिरी
प्रतिनिधी —
दहा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगून आल्यानंतरही पुन्हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घुण हत्या करणार्या नराधमास राजूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जगन्नाथ भागा आडे (वय 46) रा. शेलविहिरे, ता.अकोले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी आणि त्याचे कुटुंबीय शेलविहिरे या ठिकाणी राहण्यास आहेत. आरोपीला त्याची पत्नी रंजना इतिहास चारित्र्याविषयी नेहमीच संशय असायचा. यापूर्वीही त्याने रंजना जगन्नाथ आडे हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन गंभीररीत्या हल्ला करून तीस गंभीर जखमी केले होते. त्या गुन्ह्यांमध्ये सदर आरोपीस दहा वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. आरोपी हा शिक्षा भोगून २०११ मध्ये तुरुंगातून बाहेर आला. त्याने पुन्हा रंजनाशी संसार थाटला. त्यांचा संसार सुरू असतानाच १९ मे २०२२ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरोपीने पुन्हा पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या डोक्यात खोरे आणि टिकावाच्या दांड्याने गंभीर मारहाण करून तिला ठार मारले व घटनास्थळावरून पसार झाला. तेव्हापासून राजूर पोलीस हे त्याच्या शोधात होते.

सदर गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक माहिती वरून तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी जगन्नाथ भागा आडे हा रांजणगाव (ता. शिरूर, जिल्हा पुणे) येथे वास्तव्य करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांचे तपास पथक रांजणगाव येथे गेले.

संशयित परिसरातील जवळपास १५ चाळी, लॉजेस, हॉटेल, मेस व रेस्टॉरंट येथे आरोपीचा शोध घेतला. स्थानिक लोकांना आरोपीचे फोटो दाखविले असता फोटोतील आरोपी हा एका खोलीमध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून राहत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी राहत असलेल्या ठिकाणी पथकाने सापळा लावून त्यास रांजणगाव येथून शिताफीने ताब्यात घेतले.
यासंदर्भात रवी चा मुलगा जालिंदर जगन्नाथ आडे यांनी फिर्याद दिली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस नाईक आण्णसाहेब दातीर, पोलीस शिपाई अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे, पोलीस नाईक फुरकान शेख, प्रमोद जाधव, हवालदार कैलास नेहे, विजय मुंढे, दिलीप डगळे,अशोक काळे, अशोक गाडे, विजय फटागरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. गुन्ह्याचा अधिक तपास नरेंद्र साबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजूर पोलीस स्टेशन हे करत आहेत.
