डॉक्टर मोहन पुरीच्या आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपनीचा परवाना कायमस्वरूपी रद्द ; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
ॲड. रंजना गवांदे यांनी केली होती तक्रार
संगमनेर | प्रतिनिधी
आयुर्वेदिक औषध उत्पादन क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शिवनाथ आयुर्वेदिक प्रॉडक्ट कंपनी, आडगाव (ता. सिन्नर) (गडगे बाबा प्रकरणातील डॉक्टर मोहन पुरी) या कंपनीचा औषध उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ॲड. रंजना गवांदे यांनी केलेल्या तक्रारीनंतर झालेल्या तपासात त्रुटी आढळल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, नाशिक यांनी ३ जुलै २०२६ रोजी दिलेल्या अधिकृत पत्रानुसार, संबंधित तक्रार प्राप्त झाल्यानंतर कंपनीची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर २ जून २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने लेखी स्पष्टीकरणही सादर केले.

मात्र, तपासणी अहवाल, नोटीस, कंपनीचे स्पष्टीकरण आणि प्रत्यक्ष सुनावणीतील बाबींचा विचार करून तंत्र अधिकारी तथा अनुज्ञप्ती प्राधिकारी यांनी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या तरतुदीनुसार ३० जून २०२६ पासून कंपनीचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश पारित केला.
संबंधित कंपनीला यापूर्वी Form-25D-MH/104122 अंतर्गत आयुर्वेदिक औषध निर्मितीचा परवाना मंजूर करण्यात आला होता. मात्र, तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटींमुळे अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत परवानाच रद्द केला.
अन्न व औषध प्रशासनाने तक्रारदाराचे आभार मानत, “जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीतून ही कारवाई शक्य झाली,” असे पत्रात नमूद केले आहे.
