‘म्युल अकाउंट्स’विरोधात सायबर पोलिसांची मोठी मोहीम ; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :
सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना गुन्हेगारांकडून सामान्य नागरिकांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर सायबर पोलीस स्टेशनने ‘म्युल अकाउंट्स’ (Mule Accounts) विरोधात विशेष मोहीम सुरू केली असून, नागरिकांनी आपली बँक खाती कोणाच्याही वापरासाठी देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार विविध आमिषे दाखवून किंवा कमिशनचे प्रलोभन देऊन नागरिकांची बँक खाती वापरतात. अशा खात्यांद्वारे फसवणुकीची रक्कम वळवली जात असल्याने संबंधित खातेदारालाही गुन्ह्यात सहआरोपी (Co-accused) होण्याचा धोका निर्माण होतो.

या मोहिमेअंतर्गत सायबर पोलिसांनी एका कारवाईत १२ बँक खाती गोठवून संबंधित १२ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांसाठी सायबर पोलिसांच्या सूचना
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते वापरण्यास देऊ नका.
एटीएम कार्ड, पासबुक, चेकबुक, इंटरनेट बँकिंग किंवा ओटीपीची माहिती कोणालाही देऊ नका.
कमिशन किंवा झटपट पैसे मिळण्याच्या आमिषाला बळी पडू नका.
आपल्या खात्यात संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ बँकेशी व सायबर पोलिसांशी संपर्क साधा.
सायबर गुन्ह्यांबाबत कोणतीही तक्रार अथवा संशयास्पद बाब आढळल्यास राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
