अनधिकृत पाणी उपसा केल्यास वीजपुरवठा खंडित करा — जिल्हाधिकारी
पाणीसाठा आरक्षण व कृषी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न
अहिल्यानगर प्रतिनिधी —
‘एल-निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. शासनाच्या २०१८ च्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षण प्राधान्याने राखून कालवे व बॅकवॉटर क्षेत्रातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवावा. आवश्यकतेनुसार अशा ठिकाणांवरील वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एल-निनो’चा संभाव्य प्रभाव, पाणीसाठा आरक्षण व कृषी विभागाच्या उपाययोजनांबाबत आयोजित तातडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ.प्रदीप पठारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे, नायब तहसीलदार भारती घोरपडे तसेच कृषी, जलसंपदा, महापालिका व महसूल विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावे. जलसंपदा विभागाने पाणीचोरी रोखण्यासाठी तात्काळ भरारी पथके नियुक्त करावीत. कालवे व बॅकवॉटर क्षेत्रात सुरू असलेला अनधिकृत पाणी उपसा त्वरित बंद करावा. आवश्यकतेनुसार संबंधित विद्युत वितरण केंद्रे बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
महापालिका, नगरपालिकांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण भागात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. स्थानिक परिस्थितीनुसार नागरिकांना दैनंदिन किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच जलसंपदा विभागाच्या मुख्य व कार्यकारी अभियंत्यांनी विद्यमान पाणीसाठ्याची स्थिती तपासून पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी सविस्तर नियोजन आराखडा तातडीने सादर करावा, असे त्यांनी सांगितले.

कालव्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यास अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अधिक किफायतशीर व पाणी बचतीचे ठरत असेल, तर त्या पर्यायाची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करावी, असे निर्देशही आशिया यांनी बैठकीत दिले.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय व समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. उतारावर आडवी पेरणी करण्याबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात खते व बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र खतांचा काळाबाजार, लिकिंग तर होत नाही ना याची कृषी विभागाने भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी करावी. खत व बियाणे पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी आणि ‘डिजिटल पीक पाहणी’ मोहीम तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या.

जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारणाची कामे, गाळ काढण्याची कामे व इतर पाणी साठवण क्षमतेत वाढ करणारी कामे जलद गतीने पूर्ण करावीत, जेणेकरून उपलब्ध पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा निर्माण करता येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी सांगितले.
