मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत ; प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  –

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक भागांमध्ये वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, मुंबई-गोवा महामार्गासह वरंधा घाट आणि रायगड जिल्ह्यातील काही महत्त्वाचे मार्ग प्रभावित झाले आहेत. दरड कोसळणे, रस्त्यावर पाणी साचणे आणि पुलाजवळ बार्जेस अडकल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी परिसरात दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेषतः मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणेकडून दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरू असल्याने बचावकार्याला अडचणी येत आहेत. दरडीचा काही भाग जवळील घरांच्या परिसरात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

दरम्यान, वरंधा घाटातही मुसळधार पावसामुळे वारवंड ते उंबर्डे दरम्यान चार ते पाच ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणेकडून दरडी हटविण्याचे काम सुरू असून, मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

रायगड जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ-आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातून वाहून आलेल्या बार्जेस पुलाजवळ अडकल्याने पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंडणगड–म्हाप्रळ–गोरेगाव–माणगाव मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या यंत्रणा आवश्यक उपाययोजना करत आहेत.

याशिवाय, पेण–खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुधागड तालुक्यातील कानसळ येथे अंबा नदी परिसरात अडकलेल्या १२ कामगारांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित शासकीय यंत्रणांशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!