भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील काही धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळी वाढत आहे.

आज (दि. ६ जुलै) सकाळी १० वाजेपर्यंत भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून २४,०४९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दादासाहेब गिते यांनी दिली. आगामी काळात विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने संबंधित यंत्रणांना नदीकाठावरील गावे, वस्त्या आणि संवेदनशील भागातील नागरिकांना तातडीने सतर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभागांच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांमध्ये आवश्यक कर्मचारी तैनात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या गावांमध्ये अन्नधान्य, पिण्याचे पाणी आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गर्भवती महिला, आजारी व्यक्ती आणि दिव्यांग नागरिकांचे आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना नदीपात्र व नदीकाठापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये तसेच पूर पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धोकादायक पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
