अबब…. ढाबे, हॉटेल, किराणा दुकानांसह घरात देशी – विदेशी दारू विक्रीचा धुमाकूळ !
बघा कोणाकोणावर दाखल झाले गुन्हे !
घारगाव पोलिसांचे बारा ठिकाणी छापे
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 26
सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढाबे, हॉटेल, किराणा दुकान, टपऱ्या आणि चक्क घरातून राजरोसपणे देशी – विदेशी दारूची विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातूनच हे समोर आले आहे. पोलिसांनी 12 ठिकाणी छापे टाकून यासंदर्भात गुन्हे दाखल केले आहेत.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे नेहमीच घडत असतात. या ठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे देखील सुरू असल्याचे वारंवार समोर आले आहे. यावर पोलीस कारवाया देखील झालेल्या आहेत. अगदी कुंटणखान्यापासून ड्रग्स विक्रीपर्यंतचे अवैध धंदे या परिसरात सुरू असतात. गांजा तस्करी आणि नशिले पदार्थांची मोठी वाहतूक या परिसरातून होत आहे. अशाच वेळी पठार भागाच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्ग लगत असणाऱ्या ढाबे, हॉटेल आणि साकुर बोटा घारगाव सारख्या मोठ्या गावाच्या शिवारातील दुकानांमधून व इतर गावांमधून देशी – विदेशी दारू सर्रासपणे विक्री केली जात असल्याच्या तक्रारी नेहमीच करण्यात येत होत्या. पोलीसही त्यावर कारवाई करत होते मात्र हे धंदे कधीही बंद झालेले नाहीत.

दोन दिवसात पोलिसांनी मात्र अचानकपणे हे दारू विरुद्धची मोहीम सुरू केली आणि बारा ठिकाणी छापे घातले यामध्ये बोटा घारगाव शिवारातील घरे हॉटेल ढाबे टपऱ्या या ठिकाणी छापे घालून ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईवरून पठार भागात किती मोठ्या प्रमाणात अवैध उद्योग सुरू आहेत हेच समोर आले आहे.

यांच्यावर झाली कारवाई...
१) उत्तम तुळशीराम खेमनर याला शेंदोडी गावात दोस्ती जनरल स्टोअर्स मध्ये दारू विक्री करताना पकडले आहे २) सुनील रघुनाथ साळगट, बिरेवाडी याने हॉटेल यश इन मध्ये दारू विक्री केली म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ३) जीवन गोरक्षनाथ खिल्लारी हा बोटा, माळवाडी शिवारातील हायवे लगत असलेल्या ओम साई साकुर ड्रायव्हर ढाबा या ठिकाणी देशी विदेशी दारू विक्री करताना आढळल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ४) गणेश लक्ष्मण औटी हा बोटा शिवारात हायवे रानवारा ढाबा या ठिकाणी दारू विक्री करत असल्याचा आढळून आला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५) धीरज शिवाजी मतकर याच्यावर बोटा या ठिकाणी ओम साई ड्रायव्हर ढाबा या ठिकाणी दारू विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६) लक्ष्मण बसप्पा दोमाली हा गुरु कॉर्नर खानावळी पाठीमागे अडोसा घेऊन देशी विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला आहे. विशेष म्हणजे यात एक महिला आरोपी असून ७) सुनिता शेखर गुत्तेदार ही माय फिटनेस जिम च्या पाठीमागे देशी विदेशी दारू विक्री करताना आढळून आली तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८) बाळू रामभाऊ केदार हा वरुडी फाटा या ठिकाणी त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला दारू विक्री करताना आढळून आला. ९) म्हतू दारकू मुळे हा अकलापूर आश्रम शाळेसमोर राहत्या घरात दारू विक्री करताना आढळून आला आहे. १०) नानासाहेब पोपट अहिरे हा बोटा शिवारातील एकलव्य वस्तीसमोर राहत्या घरात दारू विक्री करताना आढळून आला. ११) मंगेश रामदास जाधव माहुली फाटा या ठिकाणी श्रुती ऑमलेट पावच्या गाडीच्या आडोशाला दारू विक्री करताना पकडण्यात आला. १२) संदीप गणपत घोडेकर हा माहुली फाटा या ठिकाणी ज्ञानेश्वर मिसळ हॉटेलच्या आडोशाला देशी विदेशी दारू विक्री करत असल्याचा आढळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे. अशा विविध ठिकाणी छापे घालून बारा जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी केलेले ही कारवाई जुजबी स्वरूपाची असून संपूर्ण पठार भागात वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होतील तेव्हाच पोलीस कारवाईला काहीतरी अर्थ राहील. नाहीतर पुन्हा हे जैसे थे प्रकार सुरू राहतील. अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
