अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण —
आरोपी डॉ. अमोल कर्पे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 18
रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी, शहरातील नामांकित डॉक्टर अमोल कर्पे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रविवारी (६ एप्रिल) संगमनेरमध्ये रामनवमी उत्सवाची धामधूम सुरू असताना हा संतापजनक प्रकार समोर आला होता. डॉ. कर्पे याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीला पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या टेरेसवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. व कोणाला काही सांगू नको, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी गेल्याचे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीने सकाळी रुग्णालयात आलेल्या आपल्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना समोर आली. दरम्यान डॉ. कर्पे हा रुग्णालयातून पसार झाला होता. पोलिसांनी आरोपीची माहिती मिळवत नाशिकमधून ताब्यात घेतले होते.

डॉ. कर्पे याला न्यायालयाने पोलिसांच्या मागणीवरून गुरुवारपर्यंत (१७ एप्रिल) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आरोपीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी पुन्हा त्याला न्यायालयासमोर आणण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे आरोपीला न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी आरोपीला ३० एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात
बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक फरहाना पटेल याप्रकरणी तपास करत आहेत.
