डिझेल भरायला आलेल्या टोळक्याने पंपावरील कर्मचाऱ्याला केली मारहाण
प्रतिनिधी —
पेट्रोल / डिझेल भरण्यासाठी गाडी जवळ लवकर आला नाही म्हणून एका कर्मचाऱ्यासह त्याला वाचवायला आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला ही गाडीतील टोळक्याने लाथाबुक्क्याने शिवीगाळ करत मारहाण केली. सदर टोळके हे मुस्लिम समाजाचे असल्याची नोंद फिर्यादीमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांना मुस्लिम समाजातील तरुणांकडून शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आडवा ओढा येथे घडली आहे. मंगळवारी ४ जूनला झालेल्या या मारहाणीसंदर्भात लखन बाबाराजा गायकवाड (वय २१ वर्षे, रा. वैदूवाडी, ता. संगमनेर) याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा ओढा येथे असलेल्या ढेरंगे पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळी सहा वाजण्याची सुमारास लाल रंगाच्या इंडिका व्हिस्टा कारमधून (क्रमांक MH 43 X 2749) आलेल्या एका तरुणाने फिर्यादीला ‘एवढा हळू का येतो, तुला लवकर येता येत नाही का? असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फिर्यादीने ‘काय झाले, मी तर लगेच आलो आहे, शिव्या देऊ नका’. असे म्हटल्याचा पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी आलेल्या गाडीतल्या तरुणांना राग आल्याने कारमधील आरोपींनी फिर्यादी लखन गायकवाड तसेच फिर्यादीचा मित्र गोरक्ष किशोर ढोमसे यालादेखील लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.
शहर पोलीस ठाण्यात सहा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सदर गाडीचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील पुढील तपास करत आहे.