लाच घेताना समाज कल्याण अधिकारी आणि निरीक्षकाला अटक !
प्रतिनिधी —
शिक्षण संस्थेकडे लाच मागणाऱ्या साताऱ्याच्या समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांना सांगलीत लाच घेताना अटक करण्यात आली. सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकपदाचाही अतिरिक्त कार्यभार सपना घाळवेंकडे होता. त्यांनी शिक्षण संस्थेकडे लाच मागितली होती. सांगलीतील समाज कल्याण कार्यालयात लाचलुचपत विभागाने कारवाई करत लाच मागणाऱ्या निरीक्षकलाही ताब्यात घेतले.
विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणार्या अनुदान पोटी सांगलीतील एका शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणार्या धनगर समाजतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या बदल्यात कमिशनची मागणी मागणी करण्यात आली होती. यामध्ये सपना घोळवे बहुजन समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील याला देखील अटक करण्यात आलीय.
शिक्षण संस्थेमध्ये इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणार्या धनगर समाजातील विद्याथ्यांना ५९ लाख ४० हजाराचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. याचा पहिला हप्ता म्हणून २९ लाख ७० हजारचा धनादेश देण्यात आला होता. याच्या कमिशन पोटी सपना घोळवे यांनी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती पाच लाख रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना सपना घोळवे यांना रंगेहात पकडण्यात आले. तर हप्ताच्या धनादेश दिल्याबद्दल दहा हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील याला देखील अटक करण्यात आली.
लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. अँटी करप्शन विभागाने तक्रारीची पडताळणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सामाजिक न्याय भवनमधील इतर मागास बहुजन कल्याण विभागात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेताना घोळवे यांना रंगेहाथ पकडले. तर याच कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रमशाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून दहा हजार लाचेची मागणी केल्याबद्दल अटक केली.