संगमनेरात एकाच दिवशी सात मटका अड्ड्यांवर छापे !
मटका किंग शरद शर्मा फरार
प्रतिनिधी —
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेरात येत भर दिवसा सुरू असलेल्या सात मटका अड्ड्यांवर (टपऱ्या) छापे टाकून गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये बरेच (पंटर) आरोपी करण्यात आले असून शरद शर्मा नावाच्या मटका किंगला देखील आरोपी करण्यात आले आहे. मात्र तो फरार झाला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

संगमनेर शहरात सुरू असलेल्या अनेक अवैध धंद्यांचा बोला बाला आहे. यामध्ये जुगार अड्डे, मटका, गांजा, अवैध कत्तलखाने हे नेहमीच ऐरणीवरचे चर्चेचे अवैध धंदे आहेत. हे अवैध धंदे सातत्याने शहरात आणि तालुक्यात सुरूच आहेत. नुकतेच शहरातील काही पोलिसांनी पोलीस निरीक्षकांच्या गैरहरीत एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. मात्र त्याचवेळी शहरात प्रवरा नदी काठावर सुरू असलेल्या दुसऱ्या मोठ्या जुगार अड्ड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे संगमनेरच्या अवैध धंद्यांवर सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

गुरुवार दिनांक १८ जानेवारी रोजी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सात ठिकाणी छापे टाकले यामध्ये संगमनेर शहरात मटका चालवत असलेला मुख्य मालक मटका किंग शरद द्वारका शर्मा हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरातील घुलेवाडी फाटा, संजय गांधी नगर, जय जवान चौक, माळीवाडा, कासट व्यापारी संकुल, अकोले नाका, नवघर गल्ली, चिखली येडू आई मंदिर परिसर अकोले रोड अशा विविध ठिकाणी टपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे.

मध्ये सिद्धांत रमेश जाधव, शरद द्वारका शर्मा, शुभम बाळू कालेकर, धनंजय धनराज कतारी, राजेंद्र बाबुलाल ओझा, राम गोरक्ष बर्डे, संतोष रूपचंद पवार, संजय चंद्रभान केरे, संतोष विठ्ठल उदावंत या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे त्यांच्याकडून मटका अड्डा चालवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा नगरचे हवालदार दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडबल तसेच पोलीस नाईक किशोर शिरसाट, शिवाजी आढाव, अजित कुऱ्हे बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली असून शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्ह्यांची नोंद केली आहे.

