छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात शिष्टमंडळाने घेतली आमदार थोरातांची भेट !
आमदार थोरातांची भूमिका सकारात्मक
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात प्रस्तावित असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्या संदर्भात आज शिष्टमंडळाने माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.

संगमनेर शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या प्रा. शशिकांत माघाडे , विधीज्ञ अमित सोनवणे, पत्रकार गौतम गायकवाड, दिलीप भोरुंडे, हेमंत मेढे आणि कार्यकर्त्यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा केली आहे.या घोषणेचे समस्त नागरिकांनी स्वागत केले.

मात्र संगमनेर तालुक्याचा इतिहास आणि परंपरा वेगळ्या आहेत. याचा संबंधितांना विसर पडल्याची टीका कार्यकर्ते करू लागले. संगमनेर तालुक्याला छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास आहे याचा सर्व नागरिकांना सार्थ अभिमान आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीने या तालुक्याची वेगळी ओळख महाराष्ट्राला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन पालक छत्रपती शिवरायांसोबत बहुजन उद्धारक बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा होणे गरजेचे आहे. असे लेखी निवेदन प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य अमित सोनवणे, गौतम गायकवाड, शशिकांत माघाडे, दिलीप भोरुंडे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना दिले. “डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात आपण पूर्णपणे सकारात्मक असून या संदर्भात आपण व्यक्तीशः लक्ष घालू ” असे आश्वासन बाळासाहेब थोरात यांनी शिष्टमंडळास दिले.

संगमनेरच्या स्थानिक नेतृत्वाने सकारात्मक भूमिका घेतल्याने बहुजन समाजाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे. लवकरच या दोन्ही स्मारकांसंदर्भात एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या विषयासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

