राजुर मधील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने उचलले कडक पाऊल !

दारू, मटका, गांजा, जुगार, ड्रग्स अवैध धंद्यांचा धुमाकूळ चव्हाट्यावर !!

ग्रामसभेत पोलीस अधिकारी, उत्पादन शुल्क व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसमोर केले कठोर नियम ; अनेक ठराव मंजूर

प्रतिनिधी — 

राजुर (ता. अकोले) येथे सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने कडक पाऊल उचलले आहे. ग्रामसभेत विविध ठराव करून अवैध धंदे करणाऱ्या आणि विरुद्ध कठोर नियमान्वये कारवाई केली जाणार आहे. या ग्रामसभेत पोलीस अधिकाऱ्यांसह उत्पादन शुल्क आणि वीज वितरण व इतर अधिकारी उपस्थित होते. राजुर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक यांनी या सभेत विविध ठराव मांडले आणि त्यास ग्रामसभेने मंजुरी देखील दिली आहे.

राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि पंचक्रोशीत अवैध दारू विक्री, मटका, जुगार, अमली पदार्थांची सर्रासपणे विक्री होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. हे बंद करावे म्हणून सामाजिक संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध आंदोलने देखील केली आहेत. राजुर गावासह पंचक्रोशीत आणि भंडारदरा सारख्या पर्यटन स्थळीही अवैध धंद्याची रेलचेल आहे.

सन २००५ सालापासून राजुर गावात दारूबंदी करण्यात आली आहे. अवैध दारू धंदा करणारे तसेच इतर अवैध धंदे करणारे, जुगार, मटका किंग, हॉटेल, ढाबेचालक या सर्वांनी दारूबंदीला हरताळ फासला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी, उत्पादन शुल्कचे अधिकारी हे या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. पोलिसांविषयी प्रचंड नाराजी आहे. राजुर पासून नगर पर्यंतचे वरिष्ठ अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत पोलीस प्रशासन उत्पादन शुल्क खाते विषयी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.

ग्रामसभेत विविध कठोर नियम करण्यात आले आहेत. दारू, मटका, गांजा विक्री जो व्यक्ती करेल, अवैध व्यवसाय करेल त्या अवैध दारू विक्रेत्याचे ग्रामपंचायत मार्फत नळ कनेक्शन कट केले जाईल. वीज वितरण कंपनी मार्फत त्या अवैध व्यवसाय धारकाचे वीज कनेक्शन कट केले जाईल. महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत सदर व्यवसाय करणाऱ्यांवर त्यांचे खरेदीखत तपासून खरेदी खतापेक्षा जास्त जागा आढळल्यास, अतिक्रमण आढळल्यास कोणतीही सूचना न देता तातडीने सदर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येईल. अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे एक किंवा जास्त घर असल्यास त्या सर्व स्थावर मालमत्तेवरही वरील प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

२ ऑक्टोबर २०२३ पासून राजुर पोलीस स्टेशन आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई धारकांवर सदर ठरावांच्या अनुषंगाने तातडीने अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल. आणि त्याची अंमलबजावणी देखील तातडीने सुरू केली जाईल. या सर्व ठराव सूचना संतोष गंगाराम मुतडक यांनी ग्रामसभेत मांडल्या त्यास सचिन मुतडक यांनी अनुमोदन दिले आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

तसेच या सभेचं इतरही ठराव करण्यात आले आहेत. त्यामध्ये राजुर ग्रामपंचायत हद्दीतील मणियार कब्रस्तानचे सुरू असलेले कंपाउंड वॉल व शेडचे काम हे अत्यंत निकृष्ट प्रतीचे करण्यात येत आहे. म्हणून सदर कामाची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी केल्याशिवाय कोणतेही बिल आता करण्यात येऊ नये तसेच सब ठेकेदार नेमणाऱ्या मूळ एजन्सी अथवा ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याची कारवाई करण्यात यावी. सूचक संतोष गंगाराम मुतडक अनुमोदक योगेश काळुराम बाराते

तसेच राजुर कॉलेज जवळील अंगणवाडी चे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे त्यामुळे या कामाची देखील चौकशी होऊन ठेकेदारांना काळया यादीत टाकावे व त्यांचे बिल अदा करून आहे

राजुर गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या बाबत कुठलीही कारवाई पोलीस करत नाहीत. काही कर्मचारी हे गेले अनेक वर्षांपासून पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे अवैध धंद्यावाल्यांशी संबंध असू शकतात. त्यामुळे अवैध व्यवसायिकांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. जे अनेक वर्षापासून कर्मचारी या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत त्यांची ततडीने बदली करण्यात यावी.

जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळा खोल्यांचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पावसाळ्यात वरून पाणी गळत असताना विद्यार्थीनीना शाळेत तसेच बसावे लागते. त्यामुळे या ठेकेदाराच्या कामाची सुद्धा गुणवत्ता विभागाकडून चौकशी करून व त्याचा अहवाल आल्याशिवाय कुठलेही बिल अदा करू नये असे सर्व ठराव सर्वानुमते मंजूरकरण्यात आले आहेत.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!