दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण !
लेकिबाळींची दिवाळी करता आली नाही !
दूधगंगाच्या ठेवीदारांनी पुन्हा महसूलमंत्र्यांपुढे मांडली कैफियत
मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे अद्यापही पसार ; पोलिसांचा तपास ठप्प
प्रतिनिधी —
८१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून सभासद, ठेवीदारांना देशोधडीला लावणारा दूधगंगा पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे हा अद्यापही पसार आहे. गुन्हा दाखल होऊन तीन महिने होत आले तरीही कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांचा आणि इतर आरोपींचा नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने शोध लावलेला नाही आणि अटकही केलेले नाही. गुन्हे शाखेचा तपास पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे रविवारी ठेवीदारांनी पुन्हा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन आर्थिक अडचणीत आम्ही आहोत. यंदाच्या दिवाळीत लेकिबाळींसाठी काहीच करता आले नाही. अशी कैफियत मांडली.

विखे पाटील यांची जनसेवा कार्यालय, लोणी येथे दुधगंगा ठेवीदार संघर्ष समितीच्या सदस्यांनी भेट घेतली व आपल्या वेगवेगळ्या अडचणींची कैफियत त्यांच्या समोर मांडली. यंदा दिवाळीचा सण आमचा हलाखीचा गेला. आमच्या लेकिबाळींना आम्ही कपडालत्ता घेऊ शकलो नाही. कष्टाचे ठेवीचे पैसे मिळायला तयार नाहीत. अपहार करणारे फ्रॉडी व मोठे कर्जदार यांना कायद्याचा धाक राहीला नाही. आरोपींकडून आणि अर्जदारांकडून वसूली होत नाही. ठेवीदारांचा भ्रमनिरास होतोय असेही समितीच्या वतीने सांगण्यात आले. मंत्री विखे पाटील यांची दूधगंगा संघर्ष समितीच्या सदस्यांनी भेट घेण्याची ही तिसरी वेळ आहे.

२१ आरोपी व मोठे कर्जदार यांच्या मालमत्ता जप्त करा. दूधगंगा पतसंस्थेची २० गुंठे जागा व इमारत जप्त करा. ठेविदारांना पैसे देण्यासाठी जी काही आयुधं वापरायची ती वापरा. पण ठेवीदारांचा गळा मोकळा करा. सामुदायिक आत्मदहन करण्यापर्यंत ठेविदाराची मानसिकता तयार झाली आहे. असेही गाऱ्हाणे मंत्री महोदयांसमोर मांडण्यात आले.

वरील सगळ्या गोष्टींचा विचार करता पुढील आठवड्यात सर्व अधिकाऱ्यांची मिटींग आयोजित करू. इतर पतसंस्थांचे संदर्भ व दाखले देऊन त्या पद्धतीची कारवाई आपण करू. योग्य मार्ग आपण काढू असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले असल्याचे मोहन लांडगे यांनी सांगितले.

