बेकायदेशीरपणे चुकीचा गर्भपात करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर वर गुन्हा दाखल !

राजुर अकोले तालुक्यातील घटना ; आणखी एका डॉक्टरची चौकशी

प्रतिनिधी —

शैक्षणिक आणि वैद्यकीय अधिकार नसताना एका डॉक्टरने अकोले तालुक्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या तरुण महिलेचा चुकीचा गर्भपात केल्याने या महिलेचा मृत्यू झाला असून  डॉक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अकोल्यातील एका दुसऱ्या डॉक्टरची देखील चौकशी करण्यात आली आहे. या प्रकाराने राजूर परिसरात खळबळ उडाली आहे.

डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे ( स्वामी समर्थ हॉस्पिटल, राजुर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

सीताबाई संदीप तळपे (वय २४ वर्षे, राहणार शेणीत, ता.अकोले) असे मयत महिलेचे नाव असून जैनुद्दीन फजल शेख पोलीस उपनिरीक्षक राजुर पोलीस स्टेशन यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीमध्ये नोंदवलेली याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे —

सिताबाई संदिप तळपे, (वय २४ वर्षे, रा. शेणीत, ता. अकोले) हिस अंगावरुन जात असल्याने ती सायंकाळच्या सुमारास डॉक्टरांनी दिलेली गोळी घेवुन झोपली होती. पती उठविण्याठी गेले असता तिला दातखिळ बसली असल्याने औषधोपचारासाठी ग्रामिण रुग्णालय राजुर येथे आले असता तेथील डॉक्टरांनी औषधोपचारापुर्वी ती मयत झाली असल्याचे घोषीत केले.

खबरी वरुन राजुर पोलीस स्टेशन मध्ये  अकस्मात मृत्यु र. नं. 10/2023 सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे दाखल करुन पुढील तपास सुरु होता.

तपास अधिकारी यांनी मरणोत्तर पंचनामा करुन शवविच्छेदन करुन मिळण्या बाबत वैद्यकीय अधिकारी, ग्रामिण रुग्णालय राजुर, यांना रिपोर्ट सादर केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी फॉरेन्सीक एक्सपर्ट उपलब्ध नसल्या कारणाने सदर मयताचे प्रेत शवविच्छेदना करिता प्रवरा ग्रामिण रुग्णालय लोणी, ता. राहाता येथे घेवून जाण्या बाबतचे पत्र दिल्याने वैद्यकीय अधिकारी, प्रवरा ग्रामिण रुग्णालय लोणी यांच्या करवी शवविच्छेदन करुन घेण्यात आले. तेथील डॉ. जंबेसिर ए. फारुकी यांनी शवविच्छेदन केले असुन त्यामध्ये मरणाचे कारण अपूर्ण अर्धवट गर्भपात असे नमूद केले होते (“DEATH DUE TO INCOMPLETE ABORTION, HOWEVER VISCERA RETAINED FOR CHEMICALANALYSIS “) असे मत डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात नमुद करुन मयताचा व्हिसेरा प्रिझर्व केला होता. सदर मयताचा व्हिसेरा हा तपासणीकामी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक येथे पाठविण्यात आलेला आहे.

सदर चौकशीमध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदविले असता मयताचे पती संदिप तुकाराम तळपे यांनी जबाबात सांगितले की, मयत पत्नी सिताबाई संदिप तळपे ही ४ महिन्याची गरोदर असतांना तिची डॉ. भोकनळ यांनी नियमित सोनोग्राफी करण्यासाठी कळविले असता तिची वैष्णवी सोनोग्राफी ॲण्ड कलर डॉप्लर क्लिनिक अकोले यांचेकडे सोनोग्राफी केली व त्याचा रिपोर्ट डॉ. भोकनळ यांना दाखविला असता त्यांनी मयत पत्नी सिताबाई हिच्या पोटातील गर्भ खराब असुन तो काढुन टाकण्याचे सुचविले.

त्यानुसार आम्ही मयत पत्नी सिताबाई हिचा गर्भपात करण्याकरिता डॉ.बाबासाहेब गोडगे (स्वामी समर्थ हॉस्पिटल, राजुर) यांचेकडे दाखल केले असता त्यांनी तिचा गर्भपात करुन त्याच दिवशी डिस्चार्ज दिला. तेंव्हापासुन तिच्या पोटात नियमित दुखु लागले. त्यानंतर तिच्या पोटात जास्तच दुखु लागल्याने आम्ही पुन्हा विश्वानंद सेवाभावी रुग्णालय, राजुर डॉ. भोकनळ यांचेकडे उपाचर करण्यासाठी दाखल केले असता त्यांनी पुन्हा तिच्या पोटाची सोनोग्राफी करण्यास सांगितली. आम्ही पुन्हा वैष्णवी सोनोग्राफी ॲण्ड कलर डॉप्लर क्लिनिक, अकोले यांचेकडे सोनोग्राफी केली असता सदरचा सोनोग्राफी रिपोर्ट डॉ. भोकनळ यांना दाखविला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, सिताबाई हिच्या पोटात गर्भाचा तुकडा राहिला असुन तुम्ही केलेला गर्भपात हा अपुर्ण असल्या बाबत सांगितले व तीची पिशवी साफ करावी लागेले असे कळविले.

त्यानंतर त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात गोळ्या देवुन घरी पाठविले. त्यादरम्यान तिचे अंगावरुन रक्तस्त्राव थोड्या फार प्रमाणात होत होता. नंतर  तिच्या पोटात जास्त दुखु लागल्याने पुन्हा डॉ. भोकनळ यांचेकडे औषधोपचाराकरिता दाखल केले. त्यांनी तपासुन पुन्हा गोळ्या औषधे देवुन घरी पाठविले. रात्री तिनेजेवणाआधी एक गोळी घेतली व तशीच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नी सिताबाई हिस मी झोपेतून उठविले असता ती झोपेतून उठली नाही ती झोपेतच मयत झाली होती.

साक्षीदार यांनी दिलेल्या जबाबा प्रमाणे तपास केला असता त्यामध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. सदर अ.मृ.चा तपासात यातील मयत सिताबाई संदिप तळपे हिच्यावर डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे व डॉ. आबासाहेब दगडु भोकनळ यांनी केलेल्या गर्भपाताच्या उपचाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक (जिल्हा रुग्णालय अहमदनगर) यांचा अभिप्राय घेण्यात आला होता. त्यानुसार  मयतावर झालेल्या औषधोपचारांच्या चौकशीकामी आठ स्तरीय समिती नेमली होती. सदर समितीने सदर मयतावर झालेल्या औषधोपचाराच्या कागदपत्रांची तपासणी करुन त्यात डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे यांना गर्भपात करण्याचा अधिकार नसल्याचे सांगुन त्यांनी यातील मयत सिताबाई संदिप तळपे हिच्यावर केलेले औषधोपचार हे योग्य नव्हते व त्यांचेवर MTP ACT नुसार कारवाई करण्यात यावी असा स्पष्ट लेखी अभिप्राय दिला आहे.

मयत सिताबाई संदिप तळपे, (रा.शेणीत, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांचा मृत्यू डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे यांनी त्यांना गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार नसताना हयगयी व निष्काळजीपणा करुन तिचा अपुर्णपणे गर्भपात करुन तिच्या गर्भपिशवीत मांसाचा तुकडा शिल्लक ठेवुन तिचेवर अयोग्य पध्दतीने औषधोपचार करुन तिच्या मृत्युस कारणीभुत झाले म्हणुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!