घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे – नाशिक महामार्गावर भरदिवसा लुटमार !
प्रतिनिधी —
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे – नाशिक महामार्गावर भर दिवसा एका ॲपे रिक्षाला मारुती इर्टिगा कार आडवी घालून चालकाला लाकडी दांडके आणि कोयत्याचा वापर करीत जबर मारहाण करून लुटमार करण्यात आली आहे. या लुटमारीत तो जण जखमी झाला असून अज्ञात आरोपींनी ॲपे रिक्षा मधून पैसे चोरून नेले आहेत.

या संदर्भात राजकुमार श्रीरंग भालके (वय४३, मूळ रा. शिरोळ, जानापुर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, हल्ली रा. माळवाडी, वारजे अमर भारत सोसायटी पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पुणे – नाशिक महामार्गावर कर्जुले पठार गावाजवळील काळभैरवनाथ मंगल कार्यालय समोर ही घटना घडली आहे. रिक्षा चालक भालके या रस्त्यावरून जात असताना पाठीमागून येणारी पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा गाडी रिक्षाला आडवी उभी केली.

गाडीतून उतरलेल्या अज्ञात चार इसमांनी लाकडी दांड्याने व कोयत्याने रिक्षाच्या काचा फोडून फिर्यादी भालके यांना लाकडी दांड्याने व कोयत्याने जबर मारहाण केली. तसेच गाडीच्या सीटच्या मागच्या बाजूला असलेले १ लाख ३५ हजार रुपये चोरून नेले.

घारगाव पोलिसांनी या संदर्भात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत.

