मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरी !
प्रतिनिधी —
मतिमंद मुलीला घरातून जवळच्या जंगलात नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतून १० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अर्जुन अण्णासाहेब जोशी (रा. पट्टेवाडी, जवळे बाळेश्वर, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पिडिता मतिमंद असल्याने अतिशय गुंतागुंतीच्या ठरलेल्या या खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी वकिलांनी अतिशय कौशल्याने आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करत आरोपीला शिक्षेपर्यंत नेले.

दरम्यान या प्रकरणी तपासातील काही कमकुवत बाबी देखील समोर आल्या असून न्यायालयाने याबाबत आपले निष्कर्ष नोंदविले आहेत. त्यामुळे हे निष्कर्ष अशा प्रकारच्या आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी गुन्ह्यात महत्वपूर्ण ठरतील.

संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर जवळ १ फेब्रुवारी २०१९ रोजी संध्याकाळच्या सुमारास अत्याचाराची ही घटना घडली होती. या संदर्भात पीडित मतिमंद मुलीच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

पिडीत मुलगी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आपल्या गाई चारून घरी आली होती. त्यानंतर ती घराशेजारी असलेल्या एका कुटुंबियाकडे टीव्ही पाहण्यासाठी गेली होती. पीडित मुलीची आई शेजारी गेली असता तेथील लहान मुलाने पीडित मुलीला पट्टेवाडीच्या चोरांनी नेल्याचे सांगितले. त्यामुळे पीडित मुलीचा नातेवाईकांनी शोध घेतला असता ती जवळपास कोठेही आढळून आली नाही.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शेता जवळून घराकडे येताना दिसली. तिच्या पाठीमागे थोड्या अंतरावर आरोपी अर्जुन अण्णासाहेब जोशी हा देखील येताना दिसला. मुलगी घाबरून तिच्या आईजवळ गेली. तिला कोठे गेली होती असे विचारले असता तिने अर्जुन जोशी याच्याकडे बोट दाखवून त्याने तिला नेल्याचे खुणावून सांगितले. तसेच अर्जुन जोशी याने बळजबरीने अत्याचार केल्याचे सांगितले.

या आशयाच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात २ फेब्रुवारी २०१९ रोजी घारगाव पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते यांनी या प्रकरणाचा तपास केला. आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले होते.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांच्यासमोर यांच्यासमोर झाली. पीडित मुलगी मतिमंद असल्याने आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करण्याचे मोठे आव्हान सरकार पक्षासमोर होते. मात्र सहाय्यक सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी मोठ्या कौशल्याने एका मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षकाच्या मदतीने न्यायालयासमोर गुन्हा सिध्द केला. या खटल्यात पीडित मुलीसह, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांच्यासह आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.

न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांनी आरोपीला दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली दंडाच्या रकमेतून दहा हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
