दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण

चार संचालकांना पोलिसांच्या नोटिसा ; मात्र फरार आरोपी अद्याप सापडेनात !

प्रतिनिधी —

सहकारासाठी राज्यात दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकाराला कलंकित करणाऱ्या दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी पसार असलेले मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय आणि अन्य काही राजकीय प्रतिष्ठित आरोपी पोलिसांना सापडत नसतानाच आता मात्र आर्थिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संस्थेच्या चार संचालकांना गुरुवारी (ता. १९ ऑक्टोंबर) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस धाडली आहे.

या चारही संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे नोटीसा बजावल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यात संगमनेरमधील काँग्रेसच्या आणखी एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असून संचालक राहिलेल्या सर्वांनाच राजकीय पार्श्वभूमी आहे.

संगमनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे यांच्यावर प्रामुख्याने आर्थिक गुन्हे शाखेची संशयाची सुई असून ते आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी कामी नोटीस बजावलेल्या संचालकांमध्ये नवनाथ अरगडे यांच्यासह भास्कर पानसरे, भास्कर शरमाळे व रामनाथ कुऱ्हे यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे.

सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दूधगंगा नागरी पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल २१ जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे असून अद्याप या तपासात फारशी प्रगती समोर आलेली नसतानाच मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, ठेवी परत मिळाव्यात आधी विविध मागण्यांसाठी ठेवीदार संघर्ष समितीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला असून आरोपी कुटेचा ठावठिकाणा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. अटक झालेल्या काही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून अद्यापही काही प्रमुख आरोपी पोलिसांनी पकडलेले नाहीत.

तर देवळाली प्रवरा (राहुरी) येथील कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

दरम्यान या गैरव्यवहार प्रकरणात सुरुवातीपासूनच चेअरमन भाऊसाहेब कुटेसह संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती असलेल्या नवनाथ अरगडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनंतर अरगडे यांना क्लीनचिट मिळाल्याचे बोलले जात होते. आता मात्र तपासा दरम्यान अरगडे यांच्यासह काही संचालक पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत.

या संचालकांच्या काळात मंजूर झालेली कर्ज प्रकरणे, इतर बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवी संदर्भातील निर्णय, संस्थेचे आर्थिक व्यवहार पाहण्याकरिता देण्यात आलेले सह्यांचे अधिकार, कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेची कर्ज प्रकरणे यासंबंधीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुरुवारी केली जाणार असल्याची माहिती समजली आहे. त्या मुळे आरोपींच्या संख्येत संचालकांच्या रुपाने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!