संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावातील चोऱ्यांचे आणि घरफोडीचे सत्र सुरुच !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या गावातील चोऱ्यांचे आणि घरफोडीचे सत्र अद्याप पर्यंत थांबले नसून बुधवारी मध्यरात्री पुन्हा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

गेल्या महिन्याभरापासून वडगाव पान येथे चोऱ्यांचे आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिक भयग्रस्त असून तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही चोरट्यांवर कुठलाही अंकुश अद्याप पर्यंत पोलिसांकडून बसलेला नाही.

एवढेच नाही तर घरफोड्या आणि चोऱ्या होऊ नयेत म्हणून रात्रीच्या वेळी तरुण मुलांनी गस्त देखील सुरू केली आहे. तरीही चोऱ्यांचे प्रकार बंद झालेले नाहीत. बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी येथील अण्णा मार्केटमध्ये असणाऱ्या दिघे पाटील इंटरप्राईजेस या दुकानाच्या मागील बाजूने पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करून प्लंबिंगच्या सामानाची चोरी केली असून त्यात ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यात प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे स्टीलचे महागडे कॉक व इतर वस्तूंची चोरी झालेली आहे.

यासंदर्भात गिरीश भास्कर दिघे (रा. कोल्हेवाडी, तालुका संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार जायभाये हे करीत आहेत.


पोलिसांचं काम गावातील तरुणांना अहोरात्र जागे राहून करावे लागत आहेत, कृपया पोलिसांनी गावातील सुरक्षा यंत्रणा वाढवायला हवी अन्यथा तरुणांना स्वरक्षणासाठी हत्यार वापरण्याचा परवाना तरी द्यावा, नसेल त्यांच्या पद्धतीने होत तर.