दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण

आरोपी कॅशियर स्वतः आर्थिक गुन्हे शाखा (नगर) यांच्यासमोर हजर ; पाच दिवसांची पोलीस कोठडी

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील बहुचर्चित दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी आरोपी असलेला कॅशियर उत्तम लांडगे हा स्वतःहून आर्थिक गुन्हे शाखा (नगर) यांच्यासमोर हजर झाल्यानंतर त्यास अटक करून आज संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश वाय. एच. अमेटा यांनी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

दरम्यान या भल्या मोठ्या अपहार प्रकरणाचा प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटे, त्याचे आरोपी असलेले कुटुंबीय व इतर प्रतिष्ठित असणारे आरोपी अद्यापही पसार असून ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

संगमनेर तालुक्याच्या सहकार क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या दूधगंगा पतसंस्थेचे अपहार प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे. यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्यासह नातेवाईक आणि इतर आरोपी हे प्रतिष्ठित आणि राजकीय पुढारी असल्याने पोलिसांचे हात अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. उलट इतर आरोपीच स्वतःहून पोलिसांकडे हजर होत असल्याने पोलिसांचा तपास कसा चालू आहे हे उघड झाले आहे.

या गुन्ह्यातील आरोपी उत्तम शंकर लांडगे (वय ४९, रा. ढुमा डोंगरा जवळ, जवळे कडलग रोड, मु. पो. वडगाव लांडगा, तालुका संगमनेर) हा पतसंस्थेत क्लार्क, वसुली अधिकारी व कॅशियर अशी कामे पाहत होता. अपहार कालावधीत तो या पदावर होता. त्याने स्वतःच्या नावावर पतसंस्थेचे लाखो रुपये मिळवले असल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेला आरोपी लांडगे हा गुरुवारी सायंकाळी नगर येथे आर्थिक गुन्हा शाखेच्या कार्यालयात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला आज न्यायाधीश यांच्यासमोर हजर केले.

सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी युक्तिवाद करीत न्यायालयाच्या निदर्शनास असे आणून दिले की, सदर आरोपीला ९ हजार रुपये दर महा पगार होता. त्याने ७५ लाख रुपये कर्ज कशाच्या जोरावर घेतले ? तसेच पतसंस्थेच्या मॅनेजरच्या खात्यावर त्यातले ५६ लाख १९ हजार रुपये ट्रान्सफर केले आणि १८ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम स्वतः काढून घेतली. या सर्व रकमेची गुंतवणूक कुठे झाली, त्यात कोणाचा सहभाग आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे घेतली याबाबतचा शोध घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे परतफेड दाखवताना संस्थेच्या अल्पबचत मुदत ठेव खात्यातून ८७ लाख रुपये काढून ते विजय गुंजाळ (मॅनेजरचा भाऊ) यांच्या अकाउंट वर आरोपीने जमा केले व पुन्हा ते आरोपीने स्वतःच्या नावावर कर्ज नील दाखवण्यासाठी वर्ग केले.

हा अपहार कसा केला आहे, आणखी कुठे अपहार केला आहे का, त्यात कोणी साथ दिली याचाही शोध घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी केली. न्यायाधीश अमेटा यांनी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

पोलिसांना आरोपी सापडत नाहीत…

८१ कोटी रुपयांच्या अपहार गुन्ह्यातील आरोपी कॅशियर उत्तम लांडगे हा स्वतःहून आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्यासह इतर बडे आरोपी पोलिसांच्या अद्यापही हाती लागले नसून आरोपी उजळ माथ्याने फिरत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आरोपींना तात्काळ अटक करावी असे निवेदन दिले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!