संगमनेरातील कॅफे हाऊस बलात्कार प्रकरण… 

कॅफे मॅझीक च्या मालकाला अटक ; दोन दिवस पोलिस कोठडी

प्रतिनिधी —

शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी अत्याचारासाठी आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून या दोघांसह आठ जणांना सहआरोपी केले आहे. यातील कॅफे मॅझीकच्या मालकाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. आत्तापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींसह लॉज चालक, कॅफे मालक अशा सहा जणांना अटक केली आहे. कॅफे मॅझीकचा मालक हा अटक केलेला सहावा आरोपी आहे.

कन्हैया दिलीप सोनवणे (वय २७ वर्षे, राहणार काझी गडी, शितलादेवी मंदिर, अमरधाम रोड नाशिक – हल्ली रा. कासारवाडी रोड, संगमनेर) असे अटक आरोपीचे नाव असून आज त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

संगमनेर शहरालगत राहावयास असलेल्या एका अंदाजे १७ वर्षे वयाच्या मुलीवर संगमनेर, शिर्डी, पेमगिरी, विठ्ठल कडा, कऱ्हे घाट येथे आशिष नानासाहेब राऊत (वय २० वर्ष) व किरण सोपान राऊत (वय ३० वर्ष, दोघे रा. मालुंजकर मळा, घुलेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघांनी वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी आशिष नानासाहेब राऊत व किरण सोपान राऊत या दोघा प्रमुख आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या अत्याचारासाठी कॅफे, लॉज उपलब्ध करून देणाऱ्या अन्य सहा जणांना सहआरोपी करत या सर्वांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६(२)(एन), ३६३ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रतिबंधक कायदा कलम ४, ६, ८, १२ व १७ (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी शहर पोलिसांनी आतापर्यंत अत्याचार करणारे आरोपी आशिष नानासाहेब राऊत, किरण सोपान राऊत यांच्यासह इतर तीन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर  बुधवारी या सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली. अद्यापही या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार  आहेत. उर्वरित आरोपींना तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव कधी अटक करतात याकडे लक्ष लागले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!