पोलिसांच्या कारवाईबाबत उलट सुलट चर्चा !
संगमनेर कॅफे हाऊस अत्याचार प्रकरण
प्रतिनिधी —
कॅफे हाऊस मध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच कॅफे हाऊस चालक, मालक, लॉज चालक यांना सुद्धा सह आरोपी करण्याचा शहर पोलिसांनी धडाका लावल्याने कॅफे हाऊस मध्ये होणाऱ्या अवैध घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे. संगमनेर मधील या घटनेत पहिल्यांदाच मुख्य आरोपींबरोबर इतर सहा जणांना आरोपी केल्याने या घटनेत सगळ्यात जास्त सहआरोपी असल्याची नोंद झाली आहे.
मात्र तरीही या गुन्ह्यातील तपासाबाबत शहरामध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्याने कॅफे हाऊस मधील अत्याचार प्रकरण चांगलेच गाजत आहे.

कॅफे हाऊस हा प्रकार बड्या शहरांमधून ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने या कॅफे हाऊस मधून घडणाऱ्या विविध घटनांची समाजात चर्चा होऊ लागली. संगमनेर मधील कॅफे हाऊस आणि हुक्का पार्लर हे चर्चेचे विषय ठरले आहेत. काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्याने ते बदनाम देखील होऊ लागले. संगमनेर शहरात असे प्रकार घडल्याने कॅफे हाऊस हा विषय ऐरणीवर वर आला.

शहरातील एका कॅफे हाऊस मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्यातून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्याची साखळी घडली. या साखळीत सहभागी असलेले मुख्य आरोपी व त्यांना साथ करणारे विविध कॅफे हाऊसचे चालक, मालक, लॉजचे चालक यांना देखील पोलिसांनी आरोपी केले आणि कारवाईला सुरुवात केली. या धडक कारवाईने शहरात तो चर्चेचा विषय ठरला.

सकारात्मक चर्चांबरोबर नकारात्मक चर्चांना देखील सुरुवात झाली. शंकादेखील उपस्थित झाल्या. तपास अधिकाऱ्यांनी कॅफे हाऊसचे चालक, मालक पकडले. अत्याचार झालेल्या लॉजचे चालकही पकडले. पण लॉजचे मालक का पकडले नाहीत ? शिर्डीतून संगमनेर येथे चौकशीसाठी आणलेल्या आणि नंतर सोडून दिलेल्या लॉज मालकाला कशामुळे सोडण्यात आले ? अशा देखील चर्चा होऊ लागल्या. शिवाय एकाच घटनेत एवढे आरोपी झाल्याने हा गुन्हा टोळीने केलेला गुन्हा तर नाही ना ? असे देखील बोलले जाऊ लागले.

एकंदरीत पाहता या घटनेतील तीन आरोपींना न्यायालयाने जामीन देखील दिला आहे. एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तर एक जण अद्यापही फरार आहे. पोक्सो सारखा गंभीर गुन्हा दाखल झालेला असताना आणि पोलिसांनी विविध कलमान्वये कारवाई केलेली असताना काही आरोपींना जामीन मिळाला या बाबतही तज्ज्ञ असलेल्या मंडळींकडून विविध शंका उपस्थित होऊ लागल्या. त्याची देखील चर्चा सुरू झाली.

