गर्विष्ठ सरकारच्या विरोधात तरुणाई सज्ज – डॉ. जयश्री थोरात 

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संगमनेरात काँग्रेससह पुरोगामी संघटनांचा जोरदार ‘जल्लोष’

संगमनेर (प्रतिनिधी)

दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या २८ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आणि धगधगत्या आंदोलनापुढे अखेर केंद्रातील गर्विष्ठ सरकारला मान तुकवावीच लागली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संगमनेरात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि सर्व समविचारी पुरोगामी संघटनांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

“सरकारच्या अमानुष लाठीहल्ल्याने तरुणाईचा आवाज दबणार नाही. या गर्विष्ठ सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी देशातील संपूर्ण तरुणाई आता रस्त्यावर उतरण्यास सज्ज झाली आहे!”

डॉ. जयश्री थोरात(अध्यक्षा, संगमनेर तालुका युवक काँग्रेस)

संगमनेर बस स्थानक परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना डॉ. थोरात म्हणाल्या की, “२० जुलै रोजी भर पावसात न्याय मागणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. शिक्षण व्यवस्थेत बुडापासून बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी खूप आधीच राजीनामा द्यायला हवा होता. केंद्र सरकारला उशिरा जाग आली असली, तरी हा लढा इथेच थांबणार नाही; उर्वरित प्रश्नांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील.”

यावेळी बोलताना दुर्गाताई तांबे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. “हे विद्यार्थी कोणत्या पक्षाचे नव्हते, तर ते या देशाचे भवितव्य होते. भर पावसात रस्त्यावर झोपलेल्या या मुला-मुलींवर झालेला अत्याचार ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची आठवण करून देणारा आहे. मात्र, युवकांच्या एकजुटीने या हुकूमशाही सरकारला चारी मुंड्या चीत केले आहे,” असा प्रहार त्यांनी केला.

या आंदोलनाला व आनंदोत्सवाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेस, छात्र भारती, शिवसेना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक समाज, दलित पॅंथर्स, शेतकरी संघटना, NSUI, महिला संघटना आणि विविध विद्यार्थी संघटनांचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

शिवसेनेचे अमर कतारी, ॲड. रंजना गवांदे, तुषार पानसरे, आणि शेखर सोसे यांनीही आपल्या आक्रमक भाषणांमधून केंद्र सरकारच्या अन्यायी कारभाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!