तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिये अंतर्गत झाल्या ७१ शस्त्रक्रिया !

रुग्णांनी मानले रोटरी नेत्र रुग्णालयाचे आभार

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या रोटरी आय केअर ट्रस्ट च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिया शिबिरात ७१ व्यक्तींवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

संगमनेर तालुक्यात तिरळेपणा निवारणासाठी नुकतेच शिबीर संपन्न झाले. शुक्रवार दि. १५ एप्रिल ते सोमवार दि. १८ एप्रिलपर्यंत हे शिबिर सुरु होते. संगमनेर रोटरी क्लब अंतर्गत रोटरी आय केअर ट्रस्टचे दर्शन नेत्र रुग्णालय व पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले होते. यामध्ये जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, अहमदनगर, संगमनेर नगरपरिषद, पंचायत समिती, संगमनेर-अकोले शिक्षण विभाग आदि संस्थांचा सहभाग होता. यावेळी अहमदनगर जिल्हा व संपूर्ण राज्यातून रुग्ण तपासणी करण्यासाठी आले होते. यामध्ये १५ एप्रिल रोजी २८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यातून ७१ रुग्णांवर दि. १६ व १७ एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील काही रुग्णांना सोमवार दि. १८ रोजी सकाळी घरी सोडण्यात आले.

या शिबिरासाठी समाजाच्या सर्व स्तरांतून रुग्ण उपस्थित होते, आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना उपस्थित सर्व दिवस मोफत अल्पोपहार व जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे ५० ते ७० हजार रुपये खर्च येतो, या शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत करण्यात आल्या. शस्त्रक्रिया करु न शकणाऱ्या रुग्णांसाठी रोटरीच्या माध्यमातून एक मोठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

शिबीराची सुरुवात शैला पडतानी यांच्या हस्ते फित कापून झाली यावेळी विशाल पडतानी, स्वाती विशाल पडतानी, श्रीगोपाल पडतानी व रोटरी सदस्य आदि उपस्थित होते.

शिबीराच्या सांगता समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे उपस्थित होते. यावेळी त्यांनी रोटरी क्लब करत असलेल्या कामांची प्रशंसा केली व क्लबमार्फत नवीन होत असलेल्या प्रकल्पांसाठी हातभार लावण्याचा विचार बोलून दाखविला. रोटरी क्लब सदस्यांनी व इतर नागरिकांनी या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर देणगी दिली. देणगीदारांचे त्यांनी आभार मानले. या शिबिरास आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, व्यापारी श्रीगोपाल पडतानी, देणगीदार शैला पडतानी, ललिता मालपाणी, सुवर्णा मालपाणी, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजकुमार जऱ्हाड आदिंनी भेट दिली.

शिबीरासाठी संगमनेर शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश सिकची, डॉ. संदीप होन, डॉ. बापुसाहेब काकड, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दिग्विजय शिंदे, डॉ. अजिंक्य म्हसे, भूलतज्ज्ञ डॉ. किशोर गाढवे, डॉ. विनीत सुखटनकर, डॉ. अनिकेत कासार, डॉ. रसिका वाघोलीकर, डॉ. मोहना देशमुख आदिंनी सहकार्य केले.

पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या १८ तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टिमने सलग दोन दिवस या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. विशेष म्हणजे त्यांनी या शस्त्रक्रिया करण्यासाठी कुठलेही मानधन घेतले नाही. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठाणचे हे १७६ वे तर रोटरी क्लब संयुक्त विद्यमाने हे ४ थे शिबीर होते. शिबीर यशस्वीततेसाठी रोटरी आय केअर ट्रस्टचे अध्यक्ष संजय राठी, सेक्रेटरी संजय लाहोटी, रोटरी आय केअरचे उपाध्यक्ष रवि पवार, खजिनदार दिपक मणियार, रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश गाडे, सेक्रेटरी हृषिकेश मोंढे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, प्रकल्पप्रमुख दिलीप मालपाणी, प्रकल्पप्रमुख अजित काकडे, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, सचिव राजेश पवार सर्व रोटरी क्लब सदस्य, रुग्णालयातील डॉक्टर्स सर्व कर्मचारी आदिंनी मेहनत घेतली.

अन् लहानग्यांच्या चेहऱ्यावर उमटले हसू…

शस्त्रक्रिया झाल्यानंतर सलग २ दिवस डोळ्यावर पट्टी असल्याने हिरमुसलेले, रडत असलेली चिमुकली बालके डोळ्यावरील पट्टी काढल्यानंतर स्वत:ला आरशात पाहिल्यावर मात्र खुदकन हसु लागले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहिल्यावर त्यांचे पालक व उपस्थित रोटरी सदस्यांच्या डोळ्यात अलगद आनंदाश्रू तरळले.

आम्हाला देवदूतच भेटले…

मुलाच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया करण्याइतकी आमची आर्थिक परिस्थिती नाही. परंतू रोटरी नेत्र रुग्णालयामार्फत घेण्यात आलेल्या या शिबीरामुळे आमच्या मुलाचा तिरळेपणा आज नाहीसा झाला. तेही कुठलाही आर्थिक खर्च न करता. रोटरी सदस्यांच्या रुपाने आम्हाला देवदूतच भेटले आहेत. रोटरीचे ऋण आम्ही आयुष्यभर विसरु शकणार नाही.

भारती प्रशांत अभंग, पालक

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!