संगमनेरच्या पठार भागात जमिनीला पडल्या भेगा !

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

येत्या दोन दिवसात भूविज्ञान विभाग पाहणी करणार

नागरिकांनी घाबरून जाऊ नये ; तहसीलदार अमोल निकम यांचे आवाहन

 प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील बोरबन (सराटी) परिसरात टेकडवाडी लोक वस्तीवर जमिनीला अचानक भेगा पडल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बुधवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूवैज्ञानिक विभागात संपर्क साधण्यात आला असून येत्या दोन दिवसात संबंधित गावाला भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे.

तालुक्यातील बोरबन (सराटी) टेकडवाडी येथे देविदास गाडेकर, अनिल गाडेकर, नवनाथ गाडेकर, शांताराम गाडेकर, शिवाजी गाडेकर, सोमनाथ गाडेकर, अनंता गाडेकर आदींसह ग्रामस्थ येथे राहतात. आजूबाजूला डोंगर व  नदीपात्र काहीच अंतरावर आहे. या परिसरात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.भेगा पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.भेगा पडलेल्या परिसरात असलेल्या कूपनलिकेचेही पाणी बंद झाले असल्याचे येथील ग्रामस्थ अनंथा गाडेकर यांचे म्हणणे आहे. याबाबत बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर यांनी प्रशासनाला  कळविले आहे. तलाठी दादा शेख व कोतवाल शशिकांत खोंड यांनी घटनास्थळी भेट दिली.

यापूर्वीही दोन वर्षापूर्वी सराटी लोकवस्ती पासून काही अंतरावर असणाऱ्या करवंदवाडी येथील काळदरा ओढ्यातील खडकाला भेगा पडून ओढ्यातील पाणी अचानक आटले होते .

नागरिकांनी घाबरू नये…

या संदर्भाने नाशिकच्या मेरी संस्थेच्याअधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. या ठिकाणी भूकंपाची कोणतीही नोंद झाली नसल्याचे मेरी संस्थेकडून कळविण्यात आले आहे. नगर जिल्हा प्रशासनाने भूवैज्ञानिक विभागाकडे संपर्क करून यासंदर्भात कळविले आहे. येत्या दोन दिवसात या विभागाचे अधिकारी येऊन गावात पाहणी करणार आहेत. प्रशासन या घडामोडी कडे लक्ष देऊन आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. 

अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!