संगमनेर तालुक्यातील पठार भागात जमिनीला पडलेल्या भेगा धोकादायक नाहीत !
भूविज्ञान विभागाचा खुलासा

प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या बोरबन (सराटी) येथे जमिनीला पडलेल्या भेगा ह्या धोकादायक नसून दुर्घटना होईल अशी शक्यता कमी आहे . त्यामुळे सध्यातरी घाबरण्यासारखे काही नाही. असा निर्वाळा या परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी दिला आहे. यामुळे घबराटीखाली दबलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

यावेळी तलाठी दादा शेख , बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर , शशिकांत खोंड यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील बोरबन परिसरात टेकडवाडी वस्तीवर जमिनीला अचानक भेगा पडल्याने व एका कुपनलीकेचे पाणी गेल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते हा प्रकार बुधवारी (दि.३०) सकाळच्या सुमारास उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १ एप्रिल ) भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. आणि ही बाब सध्यातरी धोकादायक नसल्याचे त्यांनी सांगितले.

नोव्हेंबर २०१९ साली बोरबन येथील काळदरा डोंगर परिसरात खडकाला पडलेल्या भेगा, मेरी संस्थेचे अहवाल, जुने अहवाल, कार्यालयीन उपलब्ध असलेली माहिती तसेच सँटेलाईट चित्रण, येथील क्षेत्र कमकुवत क्षेत्र आहे का, लगतच्या मुळा नदीला आलेले रोटेशनचा काही संबध आहे का, या सर्व बाबींचा अभ्यास करून या जमिनीतील भेगांचे कारण स्पष्ट होईल असेही वरिष्ठ भूवैज्ञानिक कदम म्हणाल्या.

ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, संबधित परिसरात पुढील काही दिवस जमिनीतील भेगांवर लक्ष ठेवावे. भेगांची लांबी किंवा रुंदी वाढते आहे का, रात्रीच्या वेळेला काही आवाज येतो का, भूकंपासारखे काही कंपने जाणवतात का, याकडे पुढील १५ दिवस गांभीर्याने लक्ष ठेवावे. काही हालचाल जाणवल्यास भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी केले.
