बालविवाह प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई — तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
बालविवाह या समस्येवर ग्रामस्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे लढले पाहिजे. यामध्ये जे अधिकारी, कर्मचारी हलगर्जीपना करतील त्यांच्यावर कडक कारवाई करू असा इशारा अकोले तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी दिला आहे. अकोले तालुक्यात बालविवाहाचे तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर आता बालविवाह बाबद अकोल्याचे प्रशासन एक्शन मोडवर आले आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने जिल्हा महिला बाल विकास विभाग अकोले, तहसील कार्यालय तथा अकोले तालुका बाल संरक्षण समिती, श्री समर्थ सेवा ट्रस्ट अंतर्गत “रविवारची शाळा” यांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी प्रशांत गायकवाड, स्नेहालयच्या ॲड. शुभांगी रोहकले, पूजा दहातोंडे, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, महिला पतसंस्थेच्या चेअरमन ॲड. मंगला हांडे, डॉ. उमा कुलकर्णी, महिला बाल विकास अधिकारी अर्चना एखंडे, शैला गवारी, साउ च्या अध्यक्ष प्रतिमा कुलकर्णी, गिरिजा पिचड, रविवारच्या शाळेचे श्रीनिवास रेणुकदास उपस्थित होते.

तहसीलदार मोरे म्हणाले की, बालविवाह हा एक सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. बालविवाहाच्या समस्येमुळे महिलांचे भविष्य धोक्यात येत असेल तर ही बाब अत्यंत दुर्दैवी असून यासाठी आपल्याला सर्वांना सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. ग्राम पातळीवर काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतील विशेषतः ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शाळांचे मुख्याध्यापक यांनी अलर्ट राहिले पाहिजे. जेथे कुठे बालविवाह होत असेल तर तातडीने वरिष्ठांना कळवावे आणि विवाह होऊ देऊ नये. किंबहुना बारीक लक्ष ठेऊन त्या पालकांचे समुपदेशन करावे, बालविवाह झाला असल्यास पोलिसांना कळवावे. यात कोणीही हलगर्जीपणा करू नये. केल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अनिवार्य राहील. कायद्याने कारवाई करण्या पूर्वीच ह्या समस्येचे निराकरण करावे. या कार्यशाळेचे फलित जर सांगायचे झाले तर अकोले तालुक्यात यानंतर कुठेच बालविवाह होणार नाही याचीच सर्वांनी काळजी घ्यावी. बालविवाह मुक्त भारत अभियान खऱ्या अर्थाने यशस्वी होईल असेही मोरे म्हणाले.

यावेळी बालविवाह कायदा, शासन निर्णय, बालविवाहाचे दुष्परिणाम, सामाजिक जबाबदारी, जनजागरण, अशा विविध विषयावर ॲड मंगला हांडे, डॉ.उमा कुलकर्णी, डॉ. श्यामकांत शेटे, पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, हेरंब कुलकर्णी, अर्चना एखंडे, पूजा दहातोंडे, प्रशांत गायकवाड आदींनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
बालविवाहाचे गुन्हे दाखल करणाऱ्यांचे विशेष सत्कार…!
गेल्या दोन महिन्यात अकोले तालुक्यात बालविवाहाचे गुन्हे दाखल करण्यासाठी अकोले पोलिसांत तक्रार दाखल करणाऱ्या पर्यवेक्षिका सोनाली धनगडे, ग्रामविकास अधिकारी विनायक कर्डक, मुख्याधिकारी धनश्री पवार आणि बालविवाह थांबविणार सुगाव बुद्रुकचे पोलिस पाटील राजेंद्र शिंदे यांचे विशेष सत्कार करण्यात आले. तर बालविवाह विषयावर पुस्तक लिहिणारे हेरंब कुलकर्णी यांचा देखील सत्कार करण्यात आला.

अकोले तहसीलदारांचा फतवा….
अकोले तालुक्यातील ग्राम पातळीवर काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि लग्नातील घटकांवर एका परिपत्रकाद्वारे जबाबदारी निश्चित करण्यात आली असून बालविवाह प्रतिबंधक कायदे २००६ ची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश या पत्रकात देण्यात आले असून बालविवाह विरोधी जनजागरण करण्याच्या दृष्टीने काही निर्देश यावेळी तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे यांनी दिले आहेत.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले व कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. श्रीनिवास रेणुकदास यांनी प्रास्तविक केले. स्वागत अर्चना एखंडे यांनी केले. सूत्रसंचलन रमेश खरबस यांनी केले. यावेळी पूजा दहातोंडे यांनी उपस्थिताना बालविवाह होऊ देणार नाही याची शपथ दिली. अंगणवाडी सेविका अर्चना बुळे यांनी स्वागत गीत तर संगीता साळवे यांनी समतेचे गीत म्हटले. यावेळी पर्यवेक्षिका ज्योती कोकाटे, रोहिणी शेळके, कांता गिरी, स्वाती लेंडे, यांच्यासह आकाश भालेराव, विद्या पारखे, संकेत आवारी, प्रदीप कदम, श्रध्दा मुसळे आदी उपस्थित होते.
