संगमनेरच्या डॉक्टर संघटनेचा दांभिकपणा चव्हाट्यावर…!

भोंदू गडगे बाबा प्रकरणातील आरोपी डॉक्टर मोहन पुरीच्या बेकायदेशीर उद्योगावर बाळगले मौन 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

हलगर्जीपणामुळे रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून संगमनेर येथील डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर आणि डॉक्टर अभिजीत कोरडे यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र डॉक्टरांच्या संघटनेला हे न पचल्यामुळे त्यांनी विनाकारण मीडियाला टार्गेट करून मीडिया ट्रायल चालू असल्याचा आरोप केला. आरोपी डॉक्टरांची बदनामी केली जात आहे, खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत अशा प्रकारची निवेदने पोलीस आणि प्रशासनाला देऊन तपासावर एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदू गडगे याच्या आश्रमात ‘वैद्यकीय सेवेची ऐशी तैशी’ करत भोंदूगिरीला साथ देणाऱ्या आणि औषधे पुरवणाऱ्या डॉक्टर मोहन पुरी वर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशा दुष्कृत्यांवर आणि भोंदूगिरीवर मात्र डॉक्टरांच्या या तथाकथित संघटनेने मौन बाळगले असल्याने त्यांच्या नीतिमत्तेतला दांभिकपणा समोर आला आहे.

गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत एका डॉक्टराच्या मदतीने बोगस औषधोपचारांचा बाजार मांडणाऱ्या आणि स्वतःला ‘देवमाणूस’ म्हणवून घेणाऱ्या वडगाव पान येथील भोंदू गडगेबाबाच्या पापाचा घडा अखेर भरला. पोलिसांनी या भोंदूच्या काळ्या साम्राज्याचा चक्काचूर केला आहे. समाजात वैद्यकीय सेवेला बदनाम करीत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या भोंदू गडगेबाबा आणि त्याचा साथीदार असणाऱ्या डॉक्टर मोहन पुरी या संपूर्ण प्रकरणात संगमनेरातील उच्चभ्रू डॉक्टरांच्या संघटनेने धारण केलेले मौन आता जनतेच्या टीकेचे धनी ठरत आहे. 

समाजात अंधश्रद्धा पसरवून वैद्यकीय विज्ञानालाच आव्हान देणाऱ्या या भोंदूगिरीविरोधात “ब्र” काढण्याची तसदीही या संघटनेने घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या रॅकेटचा पर्दाफाश केला, मात्र ज्यांच्या डोळ्यादेखत हे दुकान सुरू होते, ते सुशिक्षित डॉक्टर हा प्रकार माहिती असून देखील नेमके कुणाच्या दबावाखाली गप्प होते, असा जळजळीत सवाल आता विचारला जात आहे.

पोलीस कोठडीत असलेल्या गडगे बाबाच्या या भोंदूगिरीचा खरा सूत्रधार असलेला त्याचा सहकारी डॉ. मोहन पुरी हा सध्या फरार असून त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीचा आलेखही आता समोर आला आहे. वैद्यकीय पदवी मिळवण्यासाठी त्याने सात वर्षे खर्ची घातली आणि त्यासाठीही काही उलट सुलट उद्योग केल्याची चर्चा आहे. अशा या कथित डॉक्टरने औषध निर्मितीचा कारखाना थाटून या भोंदू बाबाला रसद पुरवली. हा ‘नमुना’ राज्यातील आणखी किती भोंदूंना औषधे पुरवत होता, याचे मोठे रॅकेट पोलीस तपासात उघड होण्याची दाट शक्यता आहे. 

मात्र, इतके गंभीर प्रकार उजेडात येऊनही संगमनेरच्या डॉक्टरांच्या संघटनेने साधी निषेधाची ओळही प्रसिद्ध केली नाही. स्वतःच्याच व्यवसायाची प्रतिष्ठा धुळीला मिळवणाऱ्या अशा कृत्यांकडे कानाडोळा करणे हा जनतेच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. सोयीनुसार वागण्याचा हा देखील पाखंडी पणा असल्याचे बोलले जात आहे. आपल्याला समाजाचे काही घेणेदेणे नाही अशीच वृत्तीबळावत असल्याचे यातून दिसून येते. 

दुसरीकडे, डॉक्टरांच्या संघटनेचा दुटप्पीपणा आता चव्हाट्यावर आला आहे. जिथे भोंदूगिरीवर मौन पाळले जाते, तिथेच उपचारातील हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याच्या प्रकरणात मात्र ही संघटना आक्रमक होताना दिसत आहे. दोघा डॉक्टरांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्यानंतर, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) चक्क कायद्यालाच आव्हान देण्याचे धाडस दाखवले आहे. पीडित महिलेला आपल्या पतीच्या मृत्यूला न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागले, परंतु या संघटनेला मात्र कायद्याच्या कारवाईपेक्षा आरोपी डॉक्टरांची ढाल बनण्यातच जास्त रस असल्याचे दिसते.

पोलिस आणि न्यायालयाच्या प्रक्रियेवर भाष्य करण्याऐवजी ही संघटना प्रसारमाध्यमांवर ‘मीडिया ट्रायल’चे आरोप करून दबावतंत्राचा वापर करत आहे. सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल करणे आणि प्रशासनाला निवेदने देऊन आरोपींना वाचवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. एकीकडे भोंदू बाबाच्या साम्राज्याकडे बघ्याची भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे कायद्याने गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहायचे, ही दुटप्पी नीती संतापाला निमंत्रण देणारी ठरली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!