नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे यांच्या कामकाजावर जनता समाधानी आणि असमाधानी !
समस्या, तक्रारी – नाराजीचा सूर जास्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
सेवा समिती संगमनेरच्या नावाखाली आणि एका पक्षाकडून चिन्ह घेऊन आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेची एकहाती सत्ता मिळविल्यानंतर शहराच्या विकासासंदर्भात आणि नागरी समस्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत असून यामध्ये नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त होत आहे आणि असमाधानही व्यक्त करण्यात येत आहे. विविध मूलभूत नागरी समस्या, तक्रारी आणि नाराजीचा सूर याचे प्रमाण जास्त आहे.

शहरातील उपनगरे आणि बऱ्याच भागांमध्ये कचरा व्यवस्थापन व्यवस्थित नसून अनेक ठिकाणी आजही कचरा पडलेला असतो. तसेच सकाळी होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबतही नाराजी असून पाणी अत्यंत कमी दाबाने येत असून नदीपात्रात पाणी असूनही पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यात आलेली आहे. पाण्याचा अपव्यय करणारे नागरिकही असून रस्त्यावर सडे मारण्यात पाणी वाया जात आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील बऱ्याच भागात काँक्रीटच्या रस्त्यांचे काम अद्याप रखडलेले असून रस्ते अपूर्ण आहेत.

मोठे बोल बच्चन करून शहरातील अतिक्रमण काढण्याचा जो फार्स करण्यात आला होता, तो बंद पडला असून अतिक्रमणाची स्थिती जैसे थे आहे. नगरसेवक नगराध्यक्ष आणि नेत्यांचीही अपार माया असल्याने ‘अतिक्रमण हटविणे म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ असा प्रकार झाला आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि जबाबदारी असलेल्या मुख्याधिकारी व अतिक्रमण विभागावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया आहे. नगरपालिका खत डेपो मधून मिळणारे खत हे महागले असल्याची तक्रार काहींनी केली आहे.

शहरातील विस्कळीत वीज पुरवठ्या बाबतही तक्रारी असून वीज पुरवठा अखंडीतपणे करण्यात यावा. संगमनेर शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबत सर्वच स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून बेकायदेशीर आणि नियमबाह्य इमारती बांधून पार्किंगची कुठलीही व्यवस्था न करणाऱ्या व्यक्तींवर व्यापाऱ्यांवर उद्योजकांवर कॉन्ट्रॅक्टर बिल्डर्स विकासकांवर कारवाई करावी आणि पार्किंग साठी चांगली व्यवस्था करावी असाही एक सूर आहे. बस स्थानक ते कॉलेजपर्यंत सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याचे देखील म्हटले आहे. नेहरू गार्डनची अवस्था अतिशय दयनीय झाली असून गार्डनमध्ये अस्वच्छता असते असेही म्हटले आहे.

कोण्या एकेकाळी नेहरू गार्डन मध्ये बांधण्यात आलेल्या मत्स्यालयात विविध प्रकारचे मासे होते. सद्यस्थितीत ते आहेत की नाही असा संशय व्यक्त होत असून या मत्स्यालयाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याने तेथील माशांचे वाळून बोंबील झाले असावेत अशीही शंका उपस्थित करण्यात आली आहे.
I LOVE SANGAMNER चे बोर्ड हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. माळुंगी प्रवरा आणि इतर छोट्या मोठ्या नद्यांमधले अतिक्रमण काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करण्यात यावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. तर नव्या नगराध्यक्षांना सत्तेवर येऊन काहीच महिने झाले आहेत. त्यामुळे हळूहळू विकास होईल. त्यांना वेळ द्यावा. शहर विकासाचे व्हिजन चांगले आहे. समस्यांचे निराकरण करण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. अशाही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.

या सर्व प्रकारावर सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी नाव न छापण्याच्या बोलीवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर व्यक्त होणारी मंडळी ही ग्रामीण भागातली आहे. ग्रामीण भागातल्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यांना शहरातील समस्या आणि विकास याबद्दल अर्धवट माहिती मिळत असल्याने अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा दमदार विकास चालू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
