अहिल्यानगर एलसीबी अमली पदार्थ आणि अवैध धंद्याच्या विळख्यात अडकल्याने बदनाम !

लुटुपुटू च्या कारवाया चर्चेचा विषय 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अहिल्यानगर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) अमली पदार्थ मुद्देमालाच्या अफरातफरी वरून कायदेशीर कचाट्यात अडकली तर आहेच परंतु दुसरीकडे अवैध धंद्यांवर कारवाई होत नसल्याने अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकून बदनाम झाली असल्याचे आता बोलले जात आहे. दस्तूर खुद्द एलसीबी चे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना देखील अमली पदार्थ अपहार प्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

 मटका, जुगार – देशी विदेशी दारूची अवैध विक्री 

संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यात वरील धंदे तेजित असून विशेषतः मटका धंद्यावर एलसीबी कडून कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. सर्वच मोठ्या तालुक्यांमध्ये मटका किंग निर्धोक पणे हा अवैध धंदा करत असून थातूरमातूर कारवाईत पंटर मंडळी पुढे करून कार्यभाग साधत आहेत. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईने हा धंदा बंद होत नाही. मटका किंग मोकळेच राहिल्याने धंद्यात खंड देखील पडत नाही. सर्वच प्रकारचे अवैध धंदे रोखण्याबरोबर अमली पदार्थ तस्करी हे फार मोठे आव्हान एलसीबी समोर आहे. कारवाईबाबत जिल्ह्यात मात्र फारसे चांगले चित्र नाही 

जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये मटका जुगार अवैध देशी दारू विक्री वाहतूक अमली पदार्थांची तस्करी विक्री त्यामध्ये ड्रग्स बरोबरच गांजा यावर कारवाईचे अत्यल्प प्रमाण आहे. कधीतरी अधून मधून एखादी कारवाई केली जाते आणि त्याचाच गाजावाजा केला जातो. हे धंदे सुरळीत चालण्यासाठी एखादी कारवाई दाखवून मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करून धंदे अखंडपणे कसे चालतील यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जातात. 

विशेष म्हणजे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्यासाठी एलसीबी चे पथक असले तरी अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक म्हणजेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे देखील पथक, प्रत्येक पोलीस स्टेशनची नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेली डीबी ही एक शाखा अशी एवढी यंत्रणा असताना देखील सर्वत्र अवैध धंद्यांचे पेव फुटलेले आहे. भंडारदरा सारख्या निसर्गरम्य पर्यटनाच्या ठिकाणी अनेक बेकायदेशीर बांधकामे किंवा बेकायदेशीरपणे उभे असलेल्या रेस्टॉरंट, ढाबे, हॉटेल मधून सरळ सरळ देशी-विदेशी दारूची अवैधपणे विक्री करण्यात येते. पावसाळ्यात याचे प्रमाण जास्त असते. हे सर्व वर्षभर सातत्याने चालू असते. संबंधित पोलीस ठाण्यांकडून याबाबत कुठल्याही कारवाया केल्या जात नाहीत. 

जिल्ह्यातील अनेक परमिट रूम्स, बिअर बार मधून, वाईन शॉप मधून ग्रामीण भागातील अगदी पान टपऱ्या, किराणा दुकानासह हॉटेल, ढाब्यांना देशी विदेशी दारू अवैधपणे पुरविली जाते. या पुरवठ्यामुळे सर्वत्र दारू उपलब्ध असून तिची विक्री अवैधपणे सुरू असते. प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि त्यांच्या खास अवैध डीबी पथकाला याची माहिती असते. मात्र कारवाई होत नाही. सर्वांनाच पाठीशी घातले जाते.

साईबाबा आणि पालकमंत्र्यांच्या शिर्डी मध्ये मटक्यासारख्या धंद्याला मोठे अभय आहे. येथे भरमसाठ हॉटेल लॉजिंगची संख्या आहे. बऱ्याच ठिकाणी गुप्तपणे जुगार अड्डे चालत असल्याची चर्चा नेहमीच ऐकण्यास मिळते. काही लॉजिंग अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये अडकल्याचे देखील वेळोवेळी समोर आले आहे. या अवैध प्रकाराकडे पूर्णपणे डोळेझाक केली जाते.

संगमनेर अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांचे केंद्र 

जिल्ह्यात संगमनेर हे अमली पदार्थ विक्री, तस्करी तसेच मटका, जुगार, ऑनलाईन जुगार, बिंगो, कॅफे अशा अवैध उद्योगांसाठी सुप्रसिद्ध आणि क्रमांक एक वरचे केंद्र आहे. या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात लाखो रुपयांची मटक्याची उलाढाल आहे. मात्र एलसीबी कडून येथील मटका किंग कायम मोकळे सोडले जातात. त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई केली जात नाही. आणि पूर्वीपासून अनेक गुन्हे दाखल असलेले मटका किंग व इतर आरोपी यांच्या बद्दल स्थानिक पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी तडीपारचे प्रस्ताव सादर करत नाहीत. संघटित गुन्हेगारीचे कलमही वापरले जात नाही. नेमकं पाणी कुठे मुरतंय हा संशोधनाचा विषय आहे.

अवैध उद्योगांमध्ये अडकलेले, गुन्हे दाखल झालेले निलंबित, असलेले पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्यावर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अंतिम कारवाई केली जात नाही. अगदी खंडणी सारख्या गुन्ह्यात अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना अभय मिळते. नोकरीची पुन्हा संधी मिळते. मात्र सर्वसामान्य नागरिकांवर कुठलीही चौकशी न करता थेट गुन्हे दाखल केले जातात. पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संबंधाने असलेल्या तक्रारी, गुन्ह्यांची दोन दोन वर्षे नुसती चौकशी चालू असल्याचे फार्स केले जातात. हा सर्व दिखाऊपणा आणि त्यामुळे पोलीस खात्या अंतर्गत लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी याचा परिणाम जिल्ह्यातील गुन्हेगारी अवैध धंदे यांना फायदा मिळण्यासाठी होतो.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!