अनिकेत इथापे यांच्यावरील गुन्ह्याने नगरपालिकेचे पितळ उघडे ; शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट !
संगमनेर नगरपालिका प्रशासनाची अनागोंदी चव्हाट्यावर !
संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीत कोण, कुठे आणि कशा प्रकारे अनधिकृत कामे करत आहे, याचा कसलाही थांगपत्ता नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. नगर परिषदेच्या वतीने शहरातील अनिकेत अशोक इथापे यांच्या कथित अवैध बांधकामावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या कारवाईमुळे संगमनेर शहरात प्रशासनाच्या नाकाखाली काय-काय बेकायदेशीर उद्योग सुरू आहेत, हेच समोर आले असून प्रशासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
इथापे यांच्या सुकेवाडी रोड वरील इमारतीचे पाच मजले अगदी भव्य दिव्य स्वरूपात बांधून झाले तरी नगरपालिका प्रशासनाला आणि संबंधित बांधकाम व अतिक्रमण विभागाला याची माहिती देखील नव्हती असे पालिकेच्या म्हणण्यावरूनच समोर आले आहे. एक घटना घडल्यामुळे अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहिले आणि मग इथापे आणि बांधकाम करणारे ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार किती भंपकपणाचा आहे हे देखील यातून उघड झाले आहे.

मुळात हा भंपकपणा जाणून बुजून केला जात आहे की राजकीय, आर्थिक दबावाखाली केला जात आहे ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे. कारण अशा बांधकामांचा संगमनेर शहरात सुळसुळाट झाला आहे.
शहराला अनधिकृत बांधकामांचा विळखा !
सध्या संगमनेर शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर, विनापरवाना, तसेच मंजूर नकाशा आणि परवानगीपेक्षा जास्त बांधकामे व अतिक्रमणे सर्रासपणे सुरू आहेत. विकासकांनी घातलेला हा धुमाकूळ शहराच्या पर्यावरणाच्या अन् नियोजनाच्या मुळावर आला आहे. याआधीही शहरात अनेक अनधिकृत बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. परंतु, मूठभर बिल्डर्स आणि डेव्हलपर्सवर कारवाई करण्याऐवजी नगरपालिका प्रशासन गप्प बसून तमाशा पाहत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
हॉस्पिटल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मंगल कार्यालये अन् नियमांची पायमल्ली !
शहरात उभ्या राहिलेल्या अनेक इमारतींमध्ये नियमांचे धिंडवडे उडवण्यात आले आहेत. हॉस्पिटल्सच्या नियमबाह्य बांधकामांचे जाळेच उभे राहिले आहे. शहरातील बरेच हॉस्पिटल्स अनधिकृत रित्या बांधण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. या इमारतींमध्ये ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट’ आणि ‘मेडिकल कौन्सिल’च्या नियमांचे उघड उघड उल्लंघन झाले असल्याचे सांगितले जाते. नगररचना अधिनियमाची तर अक्षरशः ऐशी तैशी करण्यात आली आहे.
नकाशा भलताच, बांधकाम भलतेच : मंजूर नकाशापेक्षा पूर्णपणे वेगळे आणि अतिरिक्त बांधकाम करण्यात आले आहे. जीवघेणा निष्काळजीपणा देखील करण्यात आला असून अनेक ठिकाणी विनापरवाना लिफ्ट उभारल्या गेल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

पार्किंगचा फज्जा व तळघरांचा गैरवापर
नियमाप्रमाणे पार्किंगची व्यवस्था कुठेच नसून जमिनीखालील तळघरांमध्ये (बेसमेंट) व्यावसायिक गाळे थाटण्यात आले आहेत. यामध्ये मंगल कार्यालये, हॉस्पिटल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मोठमोठे व्यापारी दुकाने आणि फ्लॅट सिस्टीम, रहिवासी इमारतींमध्ये उघडपणे नियम धाब्यावर बसवले जात असताना नगरपालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग आणि संबंधित अधिकारी नेमके काय करत आहेत? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात मोठे बिल्डर्स मोकाट अन् नियमांची पायमल्ली करत असताना फक्त ठराविक लोकांनाच टार्गेट केले जात आहे. विरोधकांवर सूड उगवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर केला जात असून वशिलेबाजी सुरू असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
विकासकांनी रस्त्यांच्या आणि मोकळ्या जागांच्या (Open Spaces) नियमांना हरताळ फासला आहे. शासनाच्या आरक्षित जमिनीवर टपऱ्या, दुकाने थाटून त्यातून सत्तेत असलेले मंडळीच मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करीत असल्याचे देखील आरोप होत आहेत. हे सर्व प्रकार नगरपालिकेच्या अखत्यारीत घडत असतानाही प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नाही. त्यामुळे शहराची वाट लावणाऱ्या या संपूर्ण प्रकारास जबाबदार असणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल का करण्यात येऊ नयेत? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या या पक्षपाती आणि ढिम्म कारभाराविरोधात शहरातील काही जागरूक नागरिक लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे येत्या काळात संगमनेर नगरपालिका प्रशासनाचे कारणामे उघड होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रशासन काळातील अनागोंदी देखील चव्हाट्यावर येणार आहे.

