संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम… गरीबांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’? 

नगरपालिकेच्या दुटप्पी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी !  ठराविक भाग केले टार्गेट !

संगमनेर प्रतिनिधी –

संगमनेर शहराला स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त करण्याचा मोठा गाजावाजा करत नगरपालिकेने राबवलेली ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ म्हणजे निव्वळ गरिबांच्या पोटावर मारलेला लाथ आणि राजकीय दुजाभाव असल्याचा घणाघाती आरोप आता शहरात होऊ लागला आहे. हातावर पोट भरणारे गोरगरीब विक्रेते, भाजीविक्रेते आणि हातगाडीवाल्यांनाच त्रास देण्यासाठी ही मोहीम राबवली गेल्याची चर्चा रंगू लागली असून, पालिकेच्या या मनमानी कारभारावर नागरिकांमधून नाराजी व्यक्त केला जात आहे.

‘सिंहधारी’ सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार !

संगमनेर नगरपालिकेत नव्याने सत्तेवर आलेल्या आणि वर्षपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शहराच्या विकासाच्या गप्पा मारल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात हा कारभार अत्यंत मनमानी आणि दुटप्पी पद्धतीने सुरू असल्याचे उघड झाले आहे. शहराचा विकास करण्याऐवजी फक्त गोरगरिबांना टार्गेट करून स्वतःचा राजकीय सूड किंवा अजेंडा चालवला जात आहे का? असा रोखठोक सवाल आता विचारला जात आहे.

केवळ एकाच भागातील विक्रेते टार्गेट का?

अतिक्रमण कारवाईच्या नावाने संगमनेर बस स्थानक ते बी.एड. कॉलेज रोड आणि मालदाड रोडवरील भाजीविक्रेते, तसेच नगर रोडवरील फळ विक्रेते व नाश्त्याचे स्टॉल यांच्यावर घाईघाईने कुऱ्हाड चालवण्यात येते. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर—

बस स्थानकासमोर परिस्थिती ‘जैसे थे’!

बस स्थानक ते सह्याद्री महाविद्यालय मार्गावर दोन्ही बाजूने परिस्थिती ‘जैसे थे’!

बस स्थानक ते दिल्ली नाका, तीन बत्ती चौक, पुणे नाका परिस्थिती ‘जैसे थे’!

अवैध बांधकामे, विनापरवाना बांधकामे, नियमबाह्य बांधकामे परिस्थिती ‘जैसे थे’!

अवैध रिक्षा थांबे, अवैध पार्किंग, शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील अवैध बांधकामे परिस्थिती ‘जैसे थे’!

बाजारपेठ, मेन रोड या ठिकाणी होणारी नियमबाह्य नवीन बांधकामे आणि रस्त्यावर दुकानदारांची होणारी अतिक्रमणे यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे ? इथे पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

बस स्थानक ते चावडी चौक, अशोक चौक परिस्थिती ‘जैसे थे’!

केवळ ठराविक भागातील गरिबांना हटवून नगरपालिकेतील तथाकथित ‘दादा’गिरीच्या इशाऱ्यावर चालणारे नगराध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांना नेमके काय साध्य करायचे होते? असा सवाल आता स्थानिक व्यापारी व नागरिक विचारत आहेत.

दोन-दोन आमदारांचा निधी, पण विकास ?

शहरात दोन-दोन आमदारांचा विकासनिधी आणि सरकारी पैसा येत असतानाही संगमनेर शहराच्या विकासाला मात्र खिळ बसली आहे. दोन्ही आमदारांकडून फक्त “गोरगरिबांवर अन्याय होऊ देणार नाही” आणि “सर्वच अतिक्रमणे हटवू” अशा डरकाळ्या फोडल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती ‘कृती शून्य आणि बोलबच्चन’ अशीच आहे.

नगरपालिका प्रशासन हे पूर्णपणे ‘सांगकामे’ झाले असून स्वतःच्या अधिकारांचा योग्य वापर करण्यात अपयशी ठरले आहे. कारवाईच्या नावाखाली फक्त गोरगरिबांना उघड्यावर पाडून, बड्या अतिक्रमधारकांना पाठीशी घालण्याचा हा नगरपालिकेचा खेळ आता संगमनेरकरांच्या चांगलाच लक्षात आला आहे.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!