नगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक – बहुजनांच्या हक्कांवर डल्ला मारणारे सर्व ‘प्रस्थापित’ आमच्या परीक्षेत ‘नापास’!

आरक्षणाचा अनुशेष न भरता नोकरभरतीचा ‘घोटाळा’ करणाऱ्या प्रस्थापितांवर शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांचा घणाघाती हल्ला

नगर जिल्हा बँकेच्या बिनविरोधचे ‘नाटक’ अन् पुढाऱ्यांची ‘सेटिंग’ फुसकी ! 

विशेष प्रतिनिधी —

अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ‘बिनविरोध’ची भाषा करणाऱ्या आणि आपापसात समझोत्याचे ‘नाट्य’ रचणाऱ्या प्रस्थापित पुढाऱ्यांचा, मंत्र्यांचा, आमदारांचा आणि खासदारांचा बुरखा आता टराटरा फाटला आहे. “जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली काय किंवा न झाली काय, आम्हाला त्याचा काडीचाही फरक पडत नाही ! बहुजन समाजाच्या आरक्षणावर गदा येत असताना बघ्याची भूमिका घेणारे सर्व प्रस्थापित नेते आमच्या परीक्षेत पूर्णपणे नापास झाले आहेत,” अशा कडक आणि आक्रमक शब्दांत सामाजिक कार्यकर्ते शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी प्रस्थापितांच्या ‘सेटिंग’च्या राजकारणावर जोरदार प्रहार केला आहे. सोशल मीडियातून या संदर्भाने त्यांनी केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

 नोकरभरतीतील गंभीर घोटाळ्यावर आणि प्रस्थापितांच्या संशयास्पद भूमिकेवर थेट बोट ठेवले आहे.

आरक्षणाला हरताळ: 

बँकेच्या नोकरभरतीमध्ये SC, ST, OBC, NT (अ, ब, क, ड), SBC आणि SEBC या मागासवर्गीय घटकांचा मोठा अनुशेष शिल्लक असतानाही केवळ ‘तांत्रिक’ कारणे पुढे करून आरक्षणाशिवाय भरती लादली गेली.

आर्थिक उलाढालीचा आरोप: 

आरक्षणाला बगल देऊन केलेल्या या भरती प्रक्रियेत पडद्यामागे किती मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि उलाढाली झाल्या, हे संपूर्ण नगर जिल्ह्याने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

“उंबरठे झिजवले, पण पुढाऱ्यांनी डोळेझाक केली; ही थेट बदमाशीच !”

“मागासवर्गीय आणि बहुजन समाजाचा घटनात्मक अधिकार असलेला आरक्षणाचा अनुशेष भरा, यासाठी आम्ही या पुढाऱ्यांचे आणि नेत्यांचे उंबरठे झिजवले. मात्र, सत्तेच्या मस्तीत गुंग असलेल्या या पुढाऱ्यांनी आमच्या मागण्यांकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली. मुखवटा पुरोगामित्वाचा घालायचा आणि पडद्यामागून गपचूप आरक्षणविरोधी भूमिका वटवायची, हा या नेत्यांचा खरा चेहरा आहे.”

प्रस्थापितांच्या या दुटप्पी आणि बहुजनविरोधी धोरणाचा तीव्र निषेध नोंदवत “मी या पुढाऱ्यांच्या बदमाशीचा जाहीर धिक्कार करतो !” अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!