संगमनेर चावडी येथील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ? —
तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली….
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर बुद्रुक आणि घुलेवाडी येथील तलाठी कार्यालयात खासगी व्यक्ती काम करतात अशी तक्रार लियाकत पठाण यांनी महसूल आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे सन 2021 मध्येच केली होती. कारवाईसाठी त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार यांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात खासगी व्यक्ती काम करणार नाही अशा सक्त सूचना दिल्या होत्या. मात्र आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेत खासगी व्यक्ती चावडी येथील तलाठी कार्यालयात काम करीत असल्याचे उघड केलेm त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या त्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे समोर आले असून आता संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, तहसीलदार कारवाई करणार का असे प्रश्न उपस्थित झाले असून तहसीलदार काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

येथील पत्रकार लियाकत पठाण यांनी सन 2021 मधे संगमनेर आणि घुलेवाडी तलाठी कार्यालयात खासगी व्यक्ती सरकारी काम करत असल्याची तक्रार केली होती आणि संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. कारवाई केली नाही तर उपोषण करण्याचा इशाराही दिला होता.
त्यावेळी नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त यांनी लियाकत पठाण यांना पत्र देऊन स्पष्टपणे कळविले होते की, संबंधित चावडी तलाठी कार्यालय आणि घुलेवाडी तलाठी कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना संगमनेर तहसीलदारांनी कार्यालयात खासगी व्यक्ती काम करणार नाही व काम करून देऊ नका अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती. या पत्रावरून खासगी व्यक्ती चावडी तलाठी कार्यालयात काम करतात हा विषय ऐरणीवर आला होता. त्यानंतर आमदार खताळ यांनी दोनच दिवसापूर्वी दोन खासगी व्यक्ती तलाठी कार्यालयात सरकारी दप्तर हाताळीत काम करत असल्याचे नायब तहसीलदारांसमोर उघडकीस आणले होते. त्यानंतर आता त्याच चावडीवरील तलाठी यांनी शासकीय कामात अडथळा म्हणून संबंधित खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

मात्र तहसीलदारांनी पत्र देऊनही आणि सक्त सूचना देऊनही जर खासगी व्यक्ती तलाठी कार्यालयात काम करत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी तेथील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यावर येते. या दोघांवर तहसीलदार कारवाई का करत नाहीत किंवा कारवाई का केले जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यास जबाबदार असणाऱ्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना पाठीशी का घातले जात आहे हे एक न उलगडणारे कोडे असून महसूल विभागातील बडे अधिकारी सुद्धा अशा प्रकारात सामील आहेत की काय असा संशय व्यक्त होत आहे.
