एलसीबीला संगमनेरातील अवैध धंदे, मटका अड्डयांवर कारवाईचे वावडे…

मटका जुगार अड्डयांचा – अवैध देशी विदेशी दारू विक्रीचा धुमधडाका !

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अवैध धंद्यांसाठी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या संगमनेर शहर आणि तालुक्यात मटका अड्डे सर्रासपणे सुरू आहेत या मटका अड्ड्यांवर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) वावडे असल्याचे बोलले जात असून शहरातील पारंपारिक भागांमध्ये आजही मटका अड्डे सुरू आहेत. त्याचबरोबर अवैधपणे देशी विदेशी दारू विक्रीला उधाण आले आहे. शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दारू पुरविली जात आहे.

शहरातील तेली खुंट, नेहरू चौक, रंगार गल्ली, माधव चित्रमंदिर, नवघर गल्ली, माळीवाडा, पुणे नाशिक महामार्ग, अकोले नाका, जोर्वे नाका, सय्यद बाबा चौक, काही शॉपिंग कॉम्प्लेक्सचे गाळे अशा अनेक ठिकाणी असलेल्या संगमनेरातील पारंपारिक मटका केंद्रांवर मटक्याचे आकडे घेण्याचे काम दैनंदिन पद्धतीने सुरू आहे. फक्त कत्तलखाना टार्गेट केलेल्या एलसीबी कडून या अवैध धंद्यांवर कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. 

 काही महिन्यांपूर्वी संगमनेर शहरातला मटका बंद करण्याचा नाटक वजा कारवाईचा शो पोलिसांकडून करण्यात आला. एका सत्ताधारी नेत्याने हे मटका अड्डे सुरू करून देण्यासाठी मटका किंग मंडळींकडे मोठी रक्कम मागितली होती अशी चर्चा देखील होती. मटका अड्डे सुरू करून देण्यासाठी पोलीस एलसीबी आणि मटका किंग यांच्यात मध्यस्थी करून देण्याची ती रक्कम असल्याचे बोलले जात होते. मटका सुरू असल्याने हे मोठे डील झाले की काय ? अशी शंका नागरिकांमधून ऐकण्यास मिळते.

संगमनेर शहरासह तालुक्यात तळेगाव, धांदरफळ, घारगाव, आश्वी या मोठ्या गावांसह इतरही लहान मोठ्या गावांमध्ये मटका जुगार अड्डे, अवैधपणे देशी-विदेशी दारू विक्री, हॉटेल ढाब्यांच्या खोल्यांमध्ये जुगार अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू असून एलसीबी कडून मात्र त्यात कुठलीही कारवाई होत नाही. गेल्या दीड दोन वर्षांपासून संगमनेरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची उलाढाल वाढली आहे. यावरही कारवाई झाल्याचे सध्या दिसून येत नाही. संगमनेर शहर आणि तालुक्यात गांजा तस्करी, गांजा विक्री प्रकरणी थोडीफार कारवाई झाली आहे. त्याचा तपास आणि कारवाई हे सर्वच संशयास्पद असल्याचे देखील आढळून आले आहे. एकंदरीत पाहता संगमनेर मधल्या अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय असल्याचे चित्र असून यावर कारवाई करण्याचे एलसीबीला देखील वावडे असल्याचे बोलले जात आहे. 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!