संगमनेर महसूलचा सावळा गोंधळ !
एजंटगिरी गुलदस्त्यात !!
कोतवालांचीही सुरू आहे मनमानी… चावडी नेमकी कुणाची ?
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात खासगी लोक बसतात आणि तलाठी गायब असतात. या प्रकरणावरून सध्या बराच गदारोळ झाला आहे. आमदार अमोल खताळ यांनी या ठिकाणी अचानक भेट देत खासगी लोकांविषयी तक्रार करत संताप व्यक्त केला. मात्र या कारवाईनंतर महसूल विभागाचा सावळा गोंधळ समोर आला असून कोतवालांची मनमानी देखील समोर आली आहे. याला जबाबदार महसूल खात्याचे अधिकारीच असल्याचे बोलले जात आहे. तहसीलदार प्रांत अधिकारी डोळे झाकून काम करतात का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
चावडी नेमकी कुणाची ?
चावडी नेमकी कुणाची यावर देखील चर्चा सुरू झाली असून चावडीची मालकी गुंजाळ पाटलांची असल्याचे सांगितले जात आहे. चावडीवरच्या तलाठी कार्यालयाबाहेर दर्गा असून या दर्ग्याची जागा गुंजाळ पाटील यांची आहे असे सांगितले जाते. त्यामुळे कामकाज करणारी खासगी मंडळी नेमकी चावडीत बसते की तलाठी कार्यालयात बसते हा एक कळीचा मुद्दा निर्माण झाला आहे. चावडीवरील तलाठी देखील कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार आजचा नसून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
कोतवालांची गडबड
संगमनेर चावडीवरील तलाठी कार्यालयात नेमणुकीस असलेला कोतवाल हा प्रांत कार्यालयात काम करीत असून, तळेगाव येथील कोतवाल हा चावडीवरील तलाठी कार्यालयात काम करत असल्याची माहिती समजली आहे. कोतवालांची ही नेमणूक प्रशासकीय आहे की “आवो जावो घर तुम्हारा” अशी मनमानी आहे ? याबाबत गडबड गोंधळच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चावडीवर फक्त दोनच खासगी इसम काम करत नसून तीन खासगी इसम काम करतात. दोघेजण टार्गेट झाले, तिसऱ्याचे काय असा सवाल देखील विचारला जात आहे. अशा कारवाई मागच्या हेतू याबाबत ही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
एजन्टगिरी मात्र गुलदस्त्यात
चावडीवरील तलाठी कार्यालयात एजंटगिरी होत असल्याचा आरोप करण्यात आला. ही एजंटगिरी नेमकी कुणासाठी चालू होती ? महसूल खात्यातील अधिकाऱ्यांसाठी, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यासाठी की आणखी कुणासाठी ? हे उघड होणे आवश्यक आहे. तसेच या एजंटगिरी मधून नेमके काय काय घडते याचीही माहिती उपलब्ध होण्याची गरज असून एजंटगिरीची टक्केवारी घेणारे चावडी कार्यालयापासून जिल्हा कार्यालयापर्यंत आहेत की काय याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
तहसीलदार प्रांत अधिकाऱ्यांची जबाबदारी काय ?
प्रशासनाच्या कार्यालयात अशा प्रकारे खासगी व्यक्ती येऊन थेट महसूलच्या कागदपत्रांना हात घालत असेल आणि येथे भ्रष्ट व्यवहार होत असेल तर महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांची नेमकी जबाबदारी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासकीय दप्तरच जर खासगी लोकांच्या ताब्यात दिले जात असेल तर खरे दोषी कोण ? हा प्रकार फक्त संगमनेर चावडी तलाठी कार्यालयातला नसून तालुक्यात अनेक ठिकाणी असा प्रकार दिसून येत असल्याचे नागरिक सांगतात. विशेष म्हणजे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी नेमणुकीच्या ठिकाणीच वास्तव्यास राहावे असे सरकारचे आदेश असताना कोणीही तसे राहत नसल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे त्यांच्या जागेवर सोयीसाठी परस्पर नेमणूक केलेले खासगी लोक काम करतात. चावडीवरील प्रकार तर गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. अनेक तहसीलदार, प्रांत आले आणि गेले. परिस्थिती जैसे थे आहे. हे अनेकांना माहीतही आहे. मग आता तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची धमक तथाकथित नेत्यांमध्ये आहे का असा रोखठोक सवाल विचारण्यात येत आहे.
