भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने महिला पोलिसांच्या अंगावर घातली दुचाकी ! नारी सन्मानाची ऐशी तैशी !!
गोदा ते नर्मदा जलयात्रा दरम्यान घडली घटना
गुन्हा दाखल न करण्याबाबत पोलिसांवर प्रचंड दबाव
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
भाजपमध्ये बहुचर्चित असलेली गोदा ते नर्मदा जलयात्रा संगमनेर येथे येऊन प्रवरा नदी परिसरात जाजू इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी थांबली होती. प्रवरा नदी काठावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्ताच्या वेळी फक्त व्हीआयपी गाड्यांचा ताफा (कन्वाय) आणि यात्रेतील महत्त्वाच्या गाड्या यांनाच कार्यक्रम ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला होता. मात्र अशावेळी संगमनेर येथील युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित राजेश चौधरी यांच्यासह वरद बागुल आणि आणखी एक जण मोटार सायकलवर ट्रिपल सीट येऊन थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊ लागल्याने त्यास थांबवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर थेट गाडी घालण्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.

हे युवा पदाधिकारी पिवळ्या रंगाच्या वेस्पा या मोटार सायकल वरून ट्रिपल सीट कार्यक्रम स्थळी जाण्याचा प्रयत्न करीत होते. बंदोबस्त कामी असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र थेट त्यांच्या अंगावर गाडी चालवण्याचा प्रयत्न या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याच्यासोबत असलेल्या इतर दोघांनीही पोलिसांना शिवीगाळ केली असल्याचे देखील समोर आले आहे.

गाडी आतमध्ये नेण्यास परवानगी नसल्याचे सांगितल्यावर गाडी दुसऱ्या बाजूला लावण्याची विनंती केल्यावर उध्दट भाषा वापरून, ‘आम्ही गाडी आतच घेऊन जाणार, मी युवा मोर्चा अध्यक्ष आहे’. असा दम पोलिसांना देण्यात आला. पार्किंगला परवानगी नसलेल्या ठिकाणी गाडी दुसऱ्या बाजूला लावून पायी जाताना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना, महिला पोलिसांना शिवीगाळ केली व ‘अक्कल नाही कुणाच्या गाड्या आत सोडायच्या आणि कुणाच्या नाही हे ही कळत नाही’. ‘थोबाड घेवून बोंबलत उभ्या राहिल्या’ असे बोलून पुढे जात जात शिवीगाळ करत निघुन गेले. तसेच याप्रसंगी त्या परिसरात पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे.

त्यानंतर पोलिसांनी सदर मोटरसायकल वेस्पा ताब्यात घेऊन ठेवली. नंतर सदर तीनही व्यक्तींनी ती गाडी पोलिसांच्या ताब्यातून ढकलत घेऊन गेले असल्याचे देखील सांगण्यात येते. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्ताला आणि कायद्याला कुठलीही भीक भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून घातली जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. आता या संदर्भात पोलीस कोणता पवित्रा घेतात आणि त्या तिघांवर कोणता गुन्हा दाखल करतात याची उत्सुकता जनतेला लागली आहे. या प्रकरणाची चर्चा सुरू होती. भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अभय मिळत असल्याचे देखील बोलले जात आहे.
दरम्यान या प्रकरणी त्या पदाधिकाऱ्यांसह इतर दोघांवर कुठलाही गुन्हा दाखल करू नये यासाठी सत्ताधारी गटातील बड्या नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणला जात असून धमकी वजा इशारे ही दिले जात असल्याचे समजले आहेत.
