संगमनेर तालुक्यात दडपला जातोय बालविवाह..!

सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील सर्वच षडयंत्रात सामील… 

कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर तालुक्यातील एका मोठ्या गावात सरपंचाच्या मुलाचा अल्पवयीन मुलीशी बालविवाह केल्याची धक्कादायक घटना घडली असून हा बेकायदेशीर उद्योग दडपण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील सगळेच या षड्यंत्रात सामील झाले असून गेल्या दोन महिन्यांपासून कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून सत्ताधारी राजकीय पुढार्‍यांच्या मदतीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

संगमनेर तालुक्यातील हे सरपंच बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष असूनही स्वतःच्याच मुलाचा विवाह अल्पवयीन मुलीशी करून देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे त्या मुलाचा हा दुसरा विवाह असल्याची माहिती देखील समोर येत असून पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यात आला आहे. 

यासंदर्भात बालविवाहाच्या घटनेचे सर्व पुरावे पोलीस प्रशासनाकडे देण्यात आले असूनही अद्याप पर्यंत कुठलीही फायदेशीर कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे. यावरही धक्कादायक बाब म्हणजे या षडयंत्रात सहभागी होऊन स्थानिक ग्रामसेवक आणि पोलीस पाटलाने असा विवाह झाला असल्याची माहिती नसल्याचा बनावट अहवाल सादर करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप होत असून संबंधितांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

सदर गावामध्ये त्या कुटुंबाच्या मोठे वजन असून दादागिरी आणि दडपशाहीच्या बळावर ग्रामस्थांवर दबाव आणून या विवाहबाबत कुठलीही वाच्यता करू नये असा दबाव टाकला जात आहे. तसेच या विवाहाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध असले तरी राजकीय वजन वापरून गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दडपण आणले जात आहे.

जिल्हाधिकारी – पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज 

सुमारे दोन महिन्यापासून हा बालविवाह दडपण्यासाठी विविध बेकायदेशीर उद्योग करून ग्रामस्थ आणि प्रशासनातील स्थानिक कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. यासाठी राजकीय वजन वापरले जात आहे. सदर अल्पवयीन मुलीला अन्यायापासून वाचविण्यासाठी कुठलेही प्रयत्न प्रशासनाकडून झालेले दिसत नाहीत. त्यामुळे आता या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत असून पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!