मुख्यमंत्री कार्यालयाचा तोतया सल्लागार… राज्यातील बऱ्याच मंत्र्यांसोबत चमकत होता !
वाढदिवसाला मंत्र्यांसोबतच्या फोटोंचे प्रदर्शन…!
संगमनेर तालुक्यात पतसंस्थेसह अनेकांची फसवणूक केल्याचे आरोप
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
महाराष्ट्रात सध्या तोतयांचे पीक आले आहे. आणि या सर्वच तोतयांचे जवळकीचे संबंध म्हणा अथवा परिचयाचे संबंध म्हणा राज्यातील मंत्र्यांशी देखील असल्याचे उघड होत आहे. यामध्ये आमदारांबरोबरच मंत्रिमंडळातील काही मातब्बर मंत्र्यांसमवेत अशा तोतयांची अनेक छायाचित्रे व्हायरल होत असल्याने महाराष्ट्राच्या मंत्रालय, सचिवालयात फिरणारे खरे कोण ? खोटे कोण ? असा संभ्रम निर्माण झाला असून राज्यात तोतयांचा राबता वाढल्याचे चित्र आहे.

संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर या गावातील दत्तात्रय केशव गुंजाळ हा तोतया मुंबई पोलिसांनी नुकताच पकडला असून त्याला अटक करण्यात आली. या तोतयाने मंत्रालय विधिमंडळ परिसरात आणि तेथे वावरण्यासाठी खोटी माहिती देऊन ओळखपत्र तयार करून ते वापरले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये तो मुख्यमंत्री कार्यालयाचा सल्लागार असल्याचे भासवत असल्याचे आढळून आले आहे. या तोतया बरोबर राज्याच्या या महत्त्वपूर्ण विभागांमधील बेकायदेशीर बोगस कामे करणाऱ्यांना देखील अटक करण्यात आली. मात्र या दत्तात्रय गुंजाळ यांचे राज्यातील अनेक मंत्र्यांशी ओळखीचे संबंध असल्याचे समोर येत असले तरी त्यात सत्य कितपत आहे हा संशोधनाचा विषय आहे. आरोपी गुंजाळ याची अनेक मंत्र्यांबरोबर वेगवेगळी छायाचित्रे असून अशा आरोपीचा एवढा राबता मंत्रालयात, सचिवालयात वाढलाच कसा असा प्रश्न उपस्थित झाला असून या तोतयाला तिथपर्यंत पोहोचवणारे कोण ? याचा शोध घेणे आवश्यक झाले आहे.

दत्तात्रय गुंजाळ याला अटक झाल्याचे बातम्यांमधून समोर आल्यानंतर निमगाव भोजापूर या गावातून आणि तालुक्यातील इतर गावातून त्याच्या अवैध कृत्यांबाबत अधिक माहिती समोर येऊ लागली आहे. संगमनेर येथील एका शिक्षण संस्थेत काम करणारा हा गुंजाळ लोकांची फसवणूक करण्यात पटाईत असल्याचे सांगितले जाते. त्या संस्थेत नोकरी लावून देतो म्हणून अनेकांकडून लाखो रुपये उकळले असल्याची चर्चा असून, खुद्द निमगाव भोजापूर येथील एका पतसंस्थेत देखील आरोपी गुंजाळ याने गैरव्यवहार केला असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. याची चौकशी सुद्धा झाली आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पाठीशी घालत कारवाई केली नसल्याचे आरोप आहेत. मंत्री पुढारी नेत्यांच्या तथाकथित छायाचित्रांच्या संबंधांचा वापर करून दबाव आणल्याने त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नसल्याचे गावकरी सांगतात.

बनावट कागदपत्रे व खोटी माहिती देऊन त्या आधारे थेट सचिवालय मंत्रालयातच घुसखोरी करण्याचा प्रकार मात्र गंभीर असून घुसखोरी केल्यानंतर ते अटक होईपर्यंत अनेकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या मंत्रिमंडळाला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांसोबत नेत्यांसोबत आरोपी गुंजाळची छायाचित्रे चमकत आहेत त्यांनीदेखील हे प्रकरण गांभीर्याने घेऊन अशा प्रवृत्तींचा मोड करण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

वाढदिवसाची झलक मंत्र्यांबरोबर …!
आरोपी दत्तात्रय गुंजाळ याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे फलक लावण्यात येत होते. या फलकावर चक्क आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची गुंजाळ याच्यासोबत असलेली छायाचित्रे देखील लावण्यात आलेली आहेत. यामध्ये आमदार मंत्र्यांचा समावेश आहे. गावापासून सुरू झालेला हा खेळ विधिमंडळात पोहोचला आणि विधिमंडळातून सुरू झालेला खोटेपणाचा खेळ छायाचित्रांसह गावात पसरून येथे देखील फसवणूक केली असण्याची दाट शक्यता आहे.
