संगमनेर तालुक्यातील गौणखनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी  —

आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत मागणी

तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच कारवाईची अडचण 

संगमनेर / प्रतिनिधी 

संगमनेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे गौण खनिजाचे उत्खनन होत असून उत्खनन करणाऱ्यांवर कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. कारवाई केली तरी ती कागदोपत्री दाखवली जाते व तिला अंतिम स्वरूप दिले जात नाही. त्यामुळे असे गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

संगमनेर तालुक्यात अनेक वर्षां पासून अवैध गौणखनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा मुद्दा आमदार खताळ यांनी विधान सभेत उपस्थित केला. प्रशासनाकडून गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली असल्याचे कागदोपत्री दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक कारवाया केवळ कागदावरच राहिल्या असल्याचे आमदार खताळ यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

अनेक कारवायांमध्ये दंड ठोठावण्यात आला असला तरी त्या दंडाची वसुली महसूल विभागाकडून प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे अवैध रित्या गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर केवळ दंड ठोठावून थांबू नये, तर त्यांच्या मालमत्तेवर दंडाची रक्कम टाकून वसुलीची प्रक्रिया राबवावी. तसेच अवैध गौणखनिज उत्खननावर कडक आणि परिणामकारक कारवाई करून हा प्रकार पूर्णपणे थांबवावा अशीही मागण आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

 महसूल विभाग आणि अधिकाऱ्यांना अडचण 

संगमनेर तालुक्यातील गौण खनिज अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तसेच अवैध स्टोन क्रशर चालविणाऱ्यांवर मोठ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र या कारवाईला अंतिम स्वरूप न देता ही कारवाई ‘भिजत घोंगडे’ ठेवले आहे. या कारवाईत अनेक राजकीय पुढारी आजी-माजी मंत्र्यांचे सहकारी अडकलेले असल्याने ‘कारवाईचे कागदी घोडे’ इकडून तिकडे मिरवले जातात. ही कारवाई करण्यात महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांनाच अडचण असल्याने ही कारवाई अंतिम स्वरूप घेत नसल्याचे बोलले जात आहे. दस्तूर खुद्द आमदार खताळ यांनी अशा तक्रारी करून दोन वर्ष झाले तरी महसूल विभागाने कुठलीही कारवाई केली नसल्याचे चित्र आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!