एसटी स्टॅन्डवरील छेडछाड प्रकरण उघड,— देवाचा मळा परिसरातील मंगळसूत्र चोर पकडले….

संगमनेर नगरपालिकेच्या ‘रक्षक दलाची’ दमदार कामगिरी

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या ‘रक्षक दलाने’ उल्लेखनीय कामगिरी करत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तात्काळ कारवाई करून संभाव्य अनर्थ टाळण्यात यश मिळवले आहे. नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या रक्षक दलामुळे शहरात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात सुरक्षा रक्षक दल स्थापन करण्यात आले आहे. चोरी, महिलांची छेडछाड तसेच विविध अप्रिय घटना रोखण्यासाठी आणि शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे रक्षक दल सातत्याने गस्त घालत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी ( दि १३ मार्च रोजी) अकोले बायपास रोड परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू असताना रक्षक दल अतिक्रमण पथकासोबत तैनात होते. त्याचवेळी निनावी फोनद्वारे एसटी बसस्थानक परिसरात काही कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच रक्षक दलाने तात्काळ बसस्थानक परिसरात धाव घेतली. यावेळी दोन विद्यार्थी तेथून पळून गेले.

यानंतर तेथील अधिक चौकशी केली असता संबंधित विद्यार्थ्यांकडून एका विद्यार्थिनीची छेडछाड होत असल्याचे समोर आले. संबंधित विद्यार्थिनीला पोलीस ठाण्यात नेऊन विचारणा केली असता त्या विद्यार्थ्यांकडून फोनद्वारे ब्लॅकमेलिंग व छेडछाडीचे प्रकार होत असल्याचे तिने सांगितले. दरम्यान पळून जाताना संबंधित विद्यार्थ्यांचा मोबाईल घटनास्थळी पडला होता. तो मोबाईल रक्षक दलाने जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केला असून त्याच्या आधारे पुढील तपासाला मदत होणार आहे.

याचदरम्यान शनिवारी देवाचा मळा परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती मिळताच रक्षक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. माहिती घेतल्यानंतर चोरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.

अवघ्या ३ दिवसांपूर्वी म्हणजेच ८ मार्च रोजी स्थापन करण्यात आलेले हे रक्षक दल शहरातील विविध भागांमध्ये तसेच शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात नियमित गस्त घालत आहे. त्यामुळे शहरात घडणाऱ्या अशा घटनांवर त्वरित नियंत्रण मिळवण्यास मदत होत असून नागरिकांमध्ये या दलाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या तत्पर कारवाईमुळे शहरात या दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की शहरात कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह घटना आढळल्यास तात्काळ रक्षक दलाशी संपर्क साधावा.

सुरक्षा रक्षक दल संपर्क क्रमांक : ९०६७२७३२७३

नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे रक्षक दल कार्यरत असून नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!